महिला सक्षमीकरण

Mahila Sakshamikarnसमाजात महिलांचे स्वत:चे भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी, महिलांना स्वत:कडे आणि समाजाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची ताकद मिळावी आणि एकमेकींच्या सहभागाने व सहकार्याने सकारात्मक बदलाकडे एकत्रितपणे पुढे जाता यावं यासाठी महिला सक्षमीकरण हा संस्थेचा महत्त्वाचा उपक्रम आहे.

सामाजिक नेतृत्व परिवर्तनाच्या प्रक्रियेला गतीशिल करण्याच्या उद्देशाने एक वर्षाचा “प्रभावी महिला परिवर्तनवादी राजकीय नेतृत्व विकास अभ्यासक्रम” चालविणे व गरजेनुसार विविध विषयावरील प्रशिक्षण व प्रकल्प याअंतर्गत कार्यरत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50% आरक्षण देण्यात आले आहे. याद्वारे महिला स्थानिक स्वराज्य संस्थेत सहभागी होणार आहेत. महिलांचे हे राजकीय नेतृत्व अधिक सक्षम, विकासाच्या मुद्यांना प्राधान्य देणारे व सर्वसमावेशक असे घडविण्यासाठी संस्था विविध उपक्रमाच्या माध्यमातून मोलाचा हातभार लावत आहे.

महिला सक्षमीकरण व नेतृत्व विकास कार्यक्रम अंतर्गत अभ्यासक्रम
सामाजिक व राजकीय नेतृत्व परिवर्तनाच्या प्रक्रियेत सक्रीय महिलांसाठी महिला नेतृत्व विकास अभ्यासक्रम:

कालावधी : एक वर्ष
प्रवेश अर्ज व अभ्यासक्रमाविषयी अधिक माहितीसाठी संस्थेच्या पत्त्यावर संपर्क साधावा.

महिला कमांडो ट्रेनिंग मार्गदर्शन व मुलाखत

गुरूवार, दि.6/07/2017

प्रत्येक महिलेने मनातील पारंपारिक असुरक्षिततेची भावना काढून टाकून स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करून सबल होण्यासाठी लढा द्यावा आणि जीवनातील ध्येय साध्य करावे, असे प्रतिपादन भारतातील पहिल्या महिला कमान्डो ट्रेनर डॉ. सीमा राव यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, पोलीस आयुक्तालय, नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रेरीत व्हा’ या उपक्रमांतर्गत डॉ. सीमा राव यांच्या जाहीर मुलाखत व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. राव पुढे म्हणाल्या की, समाजात असुरक्षिततेचे प्रमाण वाढले असले तरी त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी महिलांनी सज्ज होणे गरजेचे आहे. स्वत:मधील अंगभूत क्षमता, कौशल्य व धाडस यांचा मेळ घालून नव्या उमेदीने जगण्याला सामोरे जावे. मनातील नैराश्याला सकारात्मक विचारांची जोपासना करून हद्दपार करा व जीवनातील जे उदात्त ध्येय गाठा असेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉ. राव यांनी आपला प्रेरणादायी जीवनप्रवास उपस्थितांसमोर कथन केला. पत्रकार वैशाली बालाजीवाले यांनी डॉ. राव यांची मुलाखत घेतली. त्या म्हणाल्या की घरातच देशप्रेम आणि देशसेवेचे बाळकडू मिळाले. वडील स्वातंत्र्य सैनिक असल्याने प्रेरणा मिळाली. जे चांगले आहे, जगण्याला पूरक आहे ते तळमळीने केले पाहिजे. मनाचा ठाम निश्‍चय ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असतो. ‘स्काय इज द लिमीट’ हा विचार प्रत्येकाने रूजवला पाहिजे. आणि यशस्वीतेकडे वाटचाल केली पाहिजे. त्यासाठी अंगी शिस्त बाणवण्याची गरज ही त्यांनी प्रतिपादित केली. याप्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल, डॉ. सीमा राव, यांचा पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा यांनी केले. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, डॉ. मनोज शिंपी, डॉ. निवेदिता पवार आदी उपस्थित होते.

श्रावण सोहळा

शनिवार, दि. 29/07/2017

हिरवा शालू ल्यालेल्या सृष्टीशी मेळ घालीत परिधान केलेले गर्द हिरवे पोषाख, पाना-फुलांचा कल्पक वापर करीत तयार केलेली आभूषणे घालून सजलेल्या सख्या, मजेदार उखाणे, हातावर रेखाटलेली एकापेक्षा एक सरस मेहंदी डिझाइन, सोबत संस्कृतीवर्धक मंगळागौरीचे खेळ, श्रावणाची आठवण करून देणारी धमाल गाणी, नृत्य कलाकारांसोबत गप्पाटप्पा आणि बक्षिसांची लयलूट या उत्साही वातावरणात चिंब होण्याचा आनंद घेतला. निमित्त होते दै. लोकमत, नाशिक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रावण सोहळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

श्रावणाचा आल्हाददायकपणा अनुभवता येण्यासाठी महिलांच्या कलाविष्काराला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गीतसंगीत, सौंदर्य तसेच विविध कलाविष्काराच्या सादरीकरणाचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते. त्यात महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदविला. यात विशेष नैपुण्य मिळविलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. श्रावण सोहळ्याचे उद्घाटन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मनोज चोपडा, लोकमतचे बी.बी. चांडक, विजय बाविस्कर, योगअभ्यासक प्रज्ञा पाटील आदी उपस्थित होते.

स्वर-अक्षर-नृत्य कलेतून गणेशवंदना

गुरूवार, दि. 17/08/2017

तीन कलांच्या माध्यमातून विश्वास लॉन्सवर रंगलेल्या कार्यक्रमात, रंगमंचावर श्रीगणेशाची आगळ्या वेगळ्या स्वरूपात आराधना सादर करण्यांत आली. सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव ह्यांचे कॅनव्हासवर विविध रूपातील, विविध अक्षरातून गणेशाचे रूप साकारत असतांना सौ. मीना परूळकर-निकम ह्यांच्या सूरातून गणेशाची साद घातली जात होती. त्याचसमवेत प्रसिद्ध नृत्यांगना किर्ती भवाळकर व तिच्या सहनृत्यांगनांचे शास्त्रीय व अर्थपूर्ण सादरीकरण आणि त्याला समर्पक अशी अमोल पाळेकर आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांची वादनाची साथ यातून स्वर-अक्षर-नृत्याचा अविष्कार समोर आला. निमित्त होते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, संवेदना फाऊंडेशन, नाशिक.

विश्वास को-ऑप.बँक लि. नाशिक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यानंतर प्रत्यक्ष रंगमंचावरील सादरीकरणाला सुरूवात झाली. आरंभाचा ईश, प्रथम तुला वंदितो, गणपतीराया पडते मी पाया, गणराज रंगी नाचतो, सूर निरागस हो, देवा श्री गणेशा, बाप्पा मोरया रे, चिकमोत्याची माळ, टिम टिम टिम्बाली, सनईचा सूर, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अशी अनेकविध गाणी सादर करण्यात आली.

कागदी पिशव्या बनविण्याची कार्यशाळा

(बुधवार, दि.01/01/2014)
महिलांमधील मूलभूत कार्यकौशल्याला संधी उपलब्ध करून देणे म्हणजे त्यांच्या आर्थिक उन्नतीच्या प्रक्रियेला बळ देणे होय. यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन विविध प्रशिक्षण शिबिरे व कार्यशाळांचे आयोजन करून महिलांना रोजगारातून सबलीकरणाला मदत करायला हवी.

पर्यावरण रक्षण होण्यासाठी कागदी पिशव्यांचा वापर करणे ही काळाची गरज आहे या उद्देशाने या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन संस्थेने केले.यात शंभरहून अधिक महिलांना उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

‘जागतिक महिला दिन’

स्तनांचे विकार व्याख्यान – डॉ.चंद्रकांत संकलेचा (दि.8/3/14)
आजच्या बदलत्या जीवनशैलीत महिलांनी आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. आजारांविषयी अपूर्ण माहिती, डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन न करणे व आजाराचे निदान करण्यास विलंब लावणे यातूनच प्रकृतीच्या तक्रारींबाबत गुंतागुंत होत असते.आज जगात स्तनांच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे त्याचे वेळीच निदान केल्यास प्रतिबंध करण्यात यश येते. यासाठी व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निदान करणे सोपे जाते. कॅन्सरविषयीच्या पारंपारिक समजुतीही नाहिशा करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यायला हवा.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रकांत संकलेचा यांचे ‘स्तनांचे विकार’ या विषयावर स्लाईड शोसह व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ.संकलेचा यांनी महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.

महिला सक्षमीकरण

समाजात महिलांचे स्वत:चे भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी, महिलांना स्वत:कडे आणि समाजाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची ताकद मिळावी आणि एकमेकींच्या सहभागाने व सहकार्याने सकारात्मक बदलाकडे एकत्रितपणे पुढे जाता यावं यासाठी महिला सक्षमीकरण हा संस्थेचा महत्त्वाचा उपक्रम आहे. सामाजिक नेतृत्त्व परिवर्तनाच्या प्रक्रियेला गतिशील करण्याच्या उद्देशाने प्रभावी महिला परिवर्तनवादी नेतृत्त्व विकसित करणे यासाठी एक वर्षाचा ‘प्रभावी महिला परिवर्तनवादी राजकीय नेतृत्त्व विकास अभ्यासक्रम चालविणे व गरजेनुसार विविध विषयावरील प्रशिक्षण व प्रकल्प या अंतर्गत कार्यरत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत 50% महिला आरक्षण आले आहे. याद्वारे महिला प्रत्यक्ष सत्तेत सहभागी होणार आहेत. महिलांचे हे राजकीय नेतृत्त्व अधिक सक्षम, विकासाच्या मुद्यांना प्राधान्य देणारे व सर्वसमावेशक असे घडविण्यासाठी संस्था विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोलाचा हातभार लावत आहे.

महिला नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा (प्रथम टप्पा)

सामाजिक नेतृत्त्व परिवर्तनाच्या प्रक्रियेला गतिशील करण्याच्या उद्देशाने महिलांचे परिवर्तनवादी राजकीय नेतृत्व विकसित करणे हा एकमेव उद्देश महिला नेतृत्व विकास अभ्यासक्रमाचा आहे. या अभ्यासक्रमातून महिलांना मुक्त सहशिक्षणाची खुली संधी उपलब्ध करवून देण्यात आली आहे. गुरुवार, दि.20 ऑगस्ट 2015 ते रविवार, दि.23 ऑगस्ट 2015 या कालावधीमध्ये हॉटेल रॉयल हेरिटेज, शालीमार, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या अभ्यासक्रमात 39 महिला समन्वयकांनी प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग नोंदविला. स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या प्रणेत्या व ‘मान कन्हैया ट्रस्टच्या’ संचालक, मा. सुधा कांकरिया यांनी प्रशिक्षणार्थींना स्वतःचे नेतृत्व विकसित करताना आदर्शांची निवड व जोपासना कशी करावी? या विषयी मार्गदर्शन केले. तसेच ताण-तणाव व्यवस्थापन कसे करावे? हे स्पष्ट केले. अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रशिक्षक राजेश हिवरे यांनी ‘नेतृत्वगुण शैली व बदलाची प्रक्रिया या विषयावर प्रशिक्षणार्थींबरोबर गटचर्चा केली व नेतृत्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांविषयी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रामध्ये मुलाखत कशी द्यावी? याविषयी प्रशिक्षणार्थींना मा. अजित (दादा) पवार यांची झी-24 तास वृत्तवाहिनीवर झालेली मुलाखत दाखविण्यात आली.

2) महिला नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा (दुसरा टप्पा)

महिला सक्षमीकरण व नेतृत्व विकास कार्यक्रमा अंतर्गत प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा गुरुवार दि. 08 ऑक्टोबर 2015 ते रविवार, दि. 11 ऑक्टोबर 2015 या कालावधीमध्ये विश्वास लॉन्स, ठाकूर रेसिडन्सी या ठिकाणी पार पाडण्यात आला. या प्रशिक्षणात कार्यक्रमात 35 महिला समन्वयकांनी प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग नोंदविला.

उद्घाटनानंतरच्या सत्रात मा. अनिता पगारे यांनी ‘महिला सक्षमीकरण, संकल्पना, व्याप्ती, सद्यस्थिती’ याविषयी मार्गदर्शन केले. या विषयावर बोलताना त्यांनी सावित्रीबाई फुलेंचे उदाहरण देऊन सांगितले की, त्यावेळेस सावित्रीबाईंनी समाज काय म्हणेल, याचा विचार न करता त्यांच्या मनाला जे योग्य वाटले ते त्यांनी केले त्याचप्रमाणे प्रत्येक महिलेने समाजाचे भान ठेवून मनाला जे योग्य वाटेल तेच केले पाहिजे, असे सांगितले. पुढील सत्रात अनिता पगारे यांनी ‘राजकीय नेतृत्व करताना पोषाखाचे महत्त्व’ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनात त्यांनी फॅशन व पुरुषप्रधान संस्कृतीचा जवळचा संबंध आहे तसेच पोषाखाचा एवढा विचार का करायचा, पोषाखाची निर्मिती का झाली, पोषाखातून काय व्यक्त होते, राजकीय नेते व पेहराव, पोषाख कसा असावा, याविषयी मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात मुलाखत, भाषण कसे द्यावे यासाठी मा. अजितदादा, मा. गोपीनाथ मुंडे, मा. पंकजा पालवे मुंडे, मा. लालुप्रसाद यादव, मा. अरुण जेटली, मा. गुलाम नबी आझाद, यांच्या भाषणाच्या व निवडणूक प्रचार नियोजनाच्या चित्रफिती दाखवण्यात आल्या.

3) महिला नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा (तिसरा टप्पा)

महिला सक्षमीकरण व नेतृत्व विकास कार्यक्रमा अंतर्गत प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा गुरुवार, दि.26 नोव्हेंबर 2015 ते रविवार, दि. 29 नोव्हेंबर 2015 या कालावधीमध्ये हॉटेल एस. एम. इम्पेरियल, एच.पी.पेट्रोल पंपाशेजारी, सारडा सर्कल, नाशिक या ठिकाणी पार पाडण्यात आला. या अभ्यासक्रम प्रशिक्षण कार्यक्रम एकूण 32 महिला समन्वयकांनी प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग नोंदविला. प्रशिक्षणाच्या सत्रात मा. दत्ता बाळसराफ यांनी ‘महिला हक्क चळवळींचा इतिहास व सद्यःस्थिती’ या विषयी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी स्त्री-चळवळ स्पष्ट करताना लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर अशी राष्ट्रस्वातंत्र्याची तर फुले-शाहू-आंबेडकर अशी समतेची चळवळ असा कालखंड उलगडून सांगितला. तसेच 1975 मध्ये मॅक्सिको येथे भरलेली पहिली जागतिक महिला परिषद व त्यातील महत्त्वाचे समान संधी, साक्षरता, शिक्षण वाढ, लैंगिंक भेदभावाचे उच्चाटन, रोजगार, इत्यादी संदर्भात उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. याचबरोबर 1985 मध्ये स्थापन झालेल्या स्त्री-संघटना, 1994 चे देशातील पहिले महिला धोरण, महिला मुक्ती चळवळ इत्यादी स्पष्ट करून महिलांच्या सद्यःस्थितीकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. प्रशिक्षणाच्या सत्रात मा. संजीव लाटकर यांनी ‘राजकीय पार्टींचे जाहीरनामे कसे तयार होतात व त्याची अंमलबजावणी कशी होते तसेच स्वतःच्या राजकीय पार्टींच्या जाहीरनाम्याचा निवडणुकीसाठी कसा वापर करावा’ याविषयी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.

4) महिला सक्षमीकरण व नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा (चौथा टप्पा)

यशस्विनी सामाजिक अभियान व विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण व नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत महिला नेतृत्व विकास अभ्यासक्रम प्रशिक्षण कार्यशाळा दि. 28 ते 31 जानेवारी 2016 रोजी हॉटेल शांतीदत्त इन, नाशिक येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून महिला सहभागी झाल्या आहेत. या कार्यशाळेत मा.आमदार नीलम गोऱ्हे यांनी ‘राजकारणातील महिलांचे स्थान’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% ते 50% आरक्षण व्हायला 12 वर्ष लागली एकूण लोकसंख्येच्या 50% महिला आहेत. स्त्रीभ्रण हत्येमुळे जरी हे प्रमाण कमी असलं तरी साधारण 50% आपण धरू मात्र पण राजकारणात महिलांचं स्थान 4 ते 5% इतकचं दिसतं. चांगल्या बायका कुंटुंब सांभाळतात आणि उथळ बायका राजकारण करतात, असे एक समीकरण मानले जाते. स्त्रीचं कुंटुंबात, समाजात जसं दुय्यम स्थान आहे तसेच हे काहीसं राजकारणात सुद्धा आहे पण महिला आरक्षणानं हे चित्र बदललं आहे. असे प्रतिपादन आमदार नीलम गोऱ्हे यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, महिला आरक्षणामध्ये ओबीसी, एसी, एसटी सर्वसाधारण अशी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षांत अशा महिलांना तयार केले जाते. महिलांचे आरक्षण नसले की त्यांचे पती किंवा नातलग पुढे येतात. अशा प्रकारे एकाच कुंटुंबात पती-पत्नी, आजी-माजी निवडणुका लढवतात, नगराध्यक्ष बनतात महिलांना राजकीय नेतृत्व करतांना शारीरिक व मानसिक ताण येतो हा ताण कसा सहन करावा व त्यावर कशी मात करावी हे महिलांनी शिकणं महत्त्वाचे आहे. या कार्यशाळेत मा. नीला सत्यनारायण, यांनी ‘भारतीय निवडणूक पद्धती-नियम, आचारसहिंता व आरक्षण’ या विषयावर मार्गदर्शन केले. अभियानाच्या समन्वयक उषाताई दराडे यांनी ‘महिला आरक्षण व निवडून आलेल्या महिलांनी राज्यकारभार कसा करावा या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना यशस्विनी सामाजिक अभियानाचे संचालक विश्वास ठाकूर म्हणाले की, महिलांच्या कार्यकतृत्वाला नवी दिशा देण्यासाठी राजकारणात, समाजकारणात गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासाठी महिला नेतृत्व विकास, प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे महिलांनी विविध क्षेत्रांत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे हे महत्त्वाचे आहे.

5) महिला सक्षमीकरण व नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा (पाचवा टप्पा)

महिला सक्षमीकरण व नेतृत्व विकास कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षणाचा शेवटचा टप्पा दि.31 मार्च ते 3 एप्रिल 2016 या कालावधीमध्ये क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, गंगापूर रोड, नाशिक या ठिकाणी पार पाडण्यात आला. या अभासक्रम प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी महिला समन्वयकांना प्रशिक्षणाच्या सत्रात मा. जयश्री ताडेलकर, यशदा , पुणे यांनी ‘माहितीचा अधिकार, जनहित याचिका व इतर कायदे व अधिकार’ विषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की महिलांनी त्यांच्या अधिकारांप्रती जागरुक असले पाहिजे तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना माहितीचा अधिकार कसा वापरावा, जनहित याचिकांचा उद्देश हा सामाजिक हिताचा असावा. यापुढील सत्रात भाग्यश्री केंगे यांनी ‘संगणक, मोबाईल इंटरनेटचा प्रभावी वापर’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, इंटरनेट, मोबाईल क्रांतीकारीमुळे आज जगाच्या कोणत्याही भागात काय घडामोडी होतात हे क्षणार्धात समजते. हे माध्यम अत्यंत प्रभावी असून त्याच्या वापराने अनेक गोष्टी सहजसाध्य होतात. त्यामुळे महिलांनी टेक्नोसॅव्ही व्हावे.

समूह संघटनेची गरज, आणि बांधणी

निर्मिती सृजन स्वयंसेवकांची’ या मालिकेतील दुसरे प्रशिक्षण शुक्रवार दि. 4 डिसेंबर 2015 रोजी विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिकच्या प्रशिक्षण केंद्रात, गंगापूर पोलीस स्टेशन आवारात, आनंदवल्ली शिवार, नाशिक-13 येथे झाले.विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिकतर्फे आयोजित या प्रशिक्षणात युवतींसाठी स्वतःचे विचार निर्माण करू इच्छिणाऱ्या स्वयंसेविकांना समूह संघटनेची गरज का आहे त्याची बांधणी कशी केली जाते प्रत्येकाच्या आवडी निवडी आणि तिच्याकडे असलेले कौशल्य ओळखून त्यानुसार भूमिका कशी द्यावी या विषयावर खेळाच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व पहिल्यांदाच विश्वास ज्ञान प्रबोधिनीच्या संपर्कात आलेल्या नवीन मुली होत्या. मोमेंटम संस्थेच्या वतीने उर्जा पाटील, विश्वास ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने अनिता पगारे यांनी प्रशिक्षण घेतले. विश्वास ज्ञान प्रबोधिनीचे सचिन हांडे, ज्ञानेश्वर शिरसाठ आणि यशस्विनी अभियानाचे निलेश व रणजित यांनी प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. या प्रशिक्षणास 71 मुली उपस्थित होत्या.

मुलींना घराबाहेर पडणे, महाविद्यालयाव्यतिरिक्त कुठे जाणे, स्वतःच्या विकासासाठी अधिक वेळ देणे आजच्या परिस्थितीत अवघड आहे. त्यामुळे उपलब्ध वेळेत कसं जास्तीत जास्त काम करायचे, संघटन करताना प्रत्येकाची आवड निवड लक्षात ठेवून जास्तीतजास्त मुलींची क्षमता, कौशल्य कसं वापरून घ्यावे याचा वास्तवातला अनुभव देणाऱ्या खेळाच्या माध्यमातून मुलींना देण्याचा प्रयत्न या प्रशिक्षणात करण्यात आला. मुलींनी सर्व खेळात भाग घेतला. याच प्रशिक्षणात विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांची मुलाखतही मुलींनी घेतली.

स्त्री-पुरुष समानता’ प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी काय करु शकते?

निर्मिती सृजन स्वयंसेवकांची’ या मालिकेतील पुढील प्रशिक्षणात विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक ने समाजात स्त्री-पुरुष विषमता कशी निर्माण झाली, प्रत्येक मानव एक विशिष्ट प्रकारे का वागतो? पुरुष स्त्रियांवर अत्याचार का करतो? हे स्वयंसेवकांना समजावून देणे आवश्यक होते. स्वयंसेवक म्हणून काम करताना आपली स्वतःची सामाजिक जडण-घडण तसेच समाजातील प्रत्येकच व्यक्तीच्या सामाजिक जडण-घडणीचे घटक माहिती असणे आवश्यक आहे म्हणून ‘सामाजिक लिंगपदभाव’ सिद्धांत या विषयावर हे प्रशिक्षण घेतले गेले. या प्रशिक्षणात जेंडरचे प्रशिक्षक राजेश हिवरे आणि अनिता पगारे या दोघांनी मिळून हे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणात प्रशिक्षकांनी आधी स्त्री-पुरुष विषमता समाजात कुठे आहे? कशा स्वरूपात आपल्याला दिसते किंवा जाणवते? हे सहभागी पद्धतीने प्रशिक्षणार्थींकडून काढून घेतले त्यानंतर ही सामाजिक जडण-घडण समजावून घेण्यासाठी ‘सिमान दी बुवायर’ यांचा ‘सामाजिक लिंगपदभाव जडण-घडणीचा सिद्धांत’ खेळाद्वारे समजावून दिला. प्रत्येक व्यक्ती ही जन्मतः वैचारिक दृष्ट्या सारखीच असते, परंतू तिला जसा समाज, स्वतःला विकसीत करायची संधी उपलब्ध होते त्यावर ती व्यक्ती धीट की अबोल कि उद्धट कि रडकी इत्यादी घडत असते. हे या प्रशिक्षणात समाजावून घेण्यात आले. एकूण 66 स्वयंसेविका या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या.

आनंदींचा उत्सव’ युवती मेळावा

प्रास्ताविकः रोजच वर्तमानपत्र उघडून पाहिले की, एक तरी मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी वाचायला मिळते. हा अत्याचार थांबवायचा असेल तर समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आज समाजात 100 स्त्रियांवर अत्याचार झाला तर 12 च स्त्रिया त्यांच्यावरील अत्याचाराची नोंद पोलीस स्टेशनसारख्या संबंधित यंत्रणेत करतात. हे प्रमाण जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत संबंधित यंत्रणेत या विषयाप्रती गांभीर्य तसेच आवश्यक ती संवेदनशीलता निर्माण होणार नाही. खरं तर स्त्रियांचे प्रश्न हाताळण्यासाठी या विषयाचे तज्ज्ञ असलेले, पूर्णवेळ हेच काम करणारी, सर्व आवश्यक सोयी व साधनं उपलब्ध असलेली यंत्रणा असणे आवश्यक आहे. या सर्व उपायांच्या अंमलबजावणीसाठी मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये एकूणच समाजामध्ये जागरुकता येणे आवश्यक आहे या हेतूने ‘आनंदींचा उत्सव 2016’ चे आयोजन केले गेले.

आनंदींचा उत्सव 2016’ असे का?

सावित्रीबाई आणि ज्योतीबा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू करून स्त्री मुक्ती चळवळीचा तसेच समाजपरिवर्तनाचा घातला. तेव्हापासून आजपर्यंत स्त्रीवादी चळवळीने यशाचे अनेक टप्पे ओलांडले आहेत. स्त्रिया किंवा एकूण समाज विषमतेतून मुक्त होऊ शकतो. हा विश्वास आता समाजातील काही घटकांमध्ये नक्कीच निर्माण झाला आहे. स्त्रियांचे आजही आयुष्य अनेक अडचणींनी गुंतलेले आहे, ते सोडवायचेच आहे पण आजपर्यंत चळवळीने जे मिळवलं त्याचा आनंद साजरा करण्याठी हा उत्सव आहे. म्हणून हा ‘आनंदींचा उत्सव 2016’ असे नाव घेऊन साजरा करण्यात आला.

आनंदींचा उत्सव 2016’ चे वैशिष्टये

या उत्सवाचे संपूर्ण आयोजन, नियोजन, संचलन हे युवतींनी केले. उत्सवाच्या प्रचार-प्रसारापासून ते स्टॉलचे विषय ठरविणे, स्टॉलसाठी साहित्य बनिवणे, स्टॉलचे संचलन करणे अशा सर्वच जबाबदाऱ्या युवतींनी यशस्वीपणे निभावल्या. या उत्सवाचे उद्घाटन सामाजिक नेत्या मा. सुप्रियाताई सुळे यांचेबरोबर माई लेले श्रवण विकास विद्यालयाचे मूकबधीर विद्यार्थ्यांच्या नृत्यांने, तसेच घरकुल मानसिक अंपग शाळेची प्रियंका जाधव या विद्यार्थिंनीच्या नृत्यांने आणि रचना विद्यालयाची इयत्ता 6 वी ची विद्यार्थिंनी श्रृती नेरकर हीच्या प्रकल्प मांडणीने झाले. सुप्रियाताईंच्या नेतृत्व गुणांसोबतच कुठल्याही अपंगत्वाला न घाबरता जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे आणि सातत्याने आपापल्या कुवतीनुसार मानवतेच्या कल्याणाचा विचार करायला पाहिजे असा संदेश उद्घाटन सत्रात देण्याचा यशस्वी प्रयत्न उत्सव आयोजन समितीने केला. युवतींनी सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी स्वतःतील कर्तृत्व सिद्ध करण्याबरोबरच शिक्षणाचा उपयोग गुणवत्तापूर्ण करिअर घडवण्यासाठी करावा, समृद्ध विचारांची जोपासना करावी, करिअर आणि सामाजिक बांधीलकी यांची सांगड घालून मराठी संस्कृतीचे पवित्रपण, मराठीपणही जपावे असे प्रतिपादन सुप्रिया सुळे यांनी केले. ‘हमारी दौड… सपनोंकी और…’ हे ब्रीद घेऊन नाशिक शहरातल्या 15 ते 35 वयोगटातील युवतींसाठी ‘आनंदींचा उत्सव’ विश्वास लॉन्स, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला त्याप्रसंगी त्यांनी युवतींशी संवाद साधला. स्वागत व प्रास्ताविक करताना विश्वास ठाकूर म्हणाले की, युवतींमध्ये नवी जाणीव घडवण्यासाठी तिच्या करिअरला निश्चित आणि अभ्यासपूर्ण दिशा देण्यासाठी आपले विचार हक्काने मांडण्यासाठी ‘आनंदींचा उत्सव’ हे व्यासपीठ आहे. कार्य हे संघटितपणातून होत असते. मैत्रिणींचा स्नेह वाढावा आणि त्यातूनच ही चळवळ समाजाला निश्चित वैशिष्ट्यपूर्ण ध्येयापर्यंत नेणारी आहे. ‘वॉटर सेव्हिंग पॉवर’ची प्रवर्तक सृष्टी नेरकर हिने आपल्या संशोधनाची माहिती उपस्थितांना दिली. दुष्काळ रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे तसेच पाणी वाचवण्यासाठी पाठबळ देण्याची विनंती केली. याप्रसंगी यशस्विनी सामाजिक अभियानाच्या मुख्य समन्वयक उषाताई दराडे, नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे, भुजबळ नॉलेज सिटीच्या शेफाली भुजबळ, अरोमा फॅर्गंस ड्रिंकींग वॉटरच्या संगीता दातार, प्रा.रमेश उपाध्ये जे.एम.सी.टी. चे रऊफ पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात 1600 युवतींनी सहभाग नोंदविला. मेळाव्यात एकूण 15 स्टॉल्स द्वारे स्वयंसेवकांनी शिक्षण म्हणजे काय? सायबर क्राईम व त्यावरील उपाय, सैांदर्य म्हणजे काय?, मासिक पाळी आणि त्या संदर्भातील काळजी, विवाहपूर्व समुपदेशन, छेडछाड, शरीराची ओळख, कामाच्या विभागणीतील स्त्री-पुरुष विषमता, इत्यादी विषयांवर खेळांच्या, पोस्टरच्या माध्यमातून प्रबोधन केले. आनंदींचा उत्सव 2016’ च्या या उत्सवात युवतींना पोलीस विभागाचे काम कळावे, पोलीस विभाग स्त्रियांसाठी कुठल्या कुठल्या योजना, यंत्रणा चालविते यांची माहिती व्हावी यासाठी नाशिक पोलीस उपायुक्त एन. आंबिका व त्यांच्या तीन सहकारी यांची सविस्तर मुलाखत घेण्यात आली. स्व-संरक्षणाची माहिती मिळावी यासाठी लायन्स क्लब, नाशिक च्या अध्यक्षा उर्जा पाटील यांनी आयोजित केलेले ‘कराटेचे’ प्रात्यक्षिक युवतींकडून करवून घेण्यात आले. उत्सवाच्या समारोप सत्रात ‘राईट टू पी’ मुंबईच्या कार्यकर्त्या मुमताज शेख आणि सांगलीच्या या महिला उद्योग समूहाच्या प्रमुख स्नेहल लोंढे यांनी आपापल्या कामातील अनुभव युवतींसमोर मांडले तसेच युवतींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

युवती कार्यकर्ता प्रशिक्षण

सामाजिक विषमता, दारिद्रय आणि अज्ञान यामुळे ज्या मुलींना शिक्षण घेता येत नाही, स्वच्छ आरोग्य जोपासता येत नाही अशा गरजू मुलींना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी त्यांच्याबरोबर सतत राहून, त्यांच्या प्रश्‍नांवर काम करून, विविध विषयांवरील प्रशिक्षणाचे त्यांच्यासाठी आयोजन करण्याच्या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात मुलींनी त्यांच्या प्रश्नांचे, कामाचे अनुभव मांडले तसेच पुढील काळात ज्या संस्थांसोबत काम करायचे आहे. त्यांची ओळख करून घेतली.या कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी एम्पॉवर या संस्थेचे तज्ज्ञ व्याख्याते उपस्थित होते.

‘युवती सक्षमीकरण’ नाशिकच्या मखमलाबाद कॉलेज येथे वरिष्ठ महाविद्यालयातील व्याख्यान

नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या फार्मसी कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणेच्या ‘निर्भय कन्या’ योजनेअंतर्गत ‘युवती सक्षमीकरण’ या विषयावर विश्वास ज्ञान प्रबोधिनीच्या अनिता पगारे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. संस्थेच्या महाविद्यालयाच्या 120 ते 130 विद्यार्थ्यांनी व प्रतिनिधींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. तसेच ‘सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, पुणे च्या विद्यार्थी कल्याण योजनेअंतर्गत ‘निर्भय कन्या’ व्याख्यानासाठी प्रबोधिनीच्या अनिता पगारे यांचे नाशिकच्या मखमलाबाद कॉलेज येथे वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी व्याख्यान झाले. ज्यात त्यांनी निर्भयात म्हणजे काय? निर्भय का बनायचे? आणि नेमके भय कोणापासून आहे या विषयांवर उपस्थित मुलींशी संवाद साधला. यात 50 ते 55 मुली व 10 शिक्षकांनी सहभाग घेतला होता.

आंतरराष्ट्रीय महिला दिन

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य लाईव्हलीहुड मिशन, नाशिक विभागाने त्रिंबक नगर पालिकेच्या पुढाकाराने निवृत्तीनाथ महाराज मंदिर, त्रिंबक येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात स्थानिक 80 ते 90 महिला सहभागी झाल्या होत्या. नाशिक महिला वकील संघटनेच्या अॅड. इंद्रायणी पटणी यांनी ‘महिलांचे कायदे’व विश्वास ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने श्रीमती अनिता पगारे यांनी ‘व्यावसायिकता काळाची गरज’ हा विषय मांडला.

आम्हाला अनुसरण करा

संपर्क कार्यालय

location-icon
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक
निरज हाईट्स, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३ (महाराष्ट्र)
fax-icon
०२५३ - २३०५६०५
time-icon
info@vishwasdynanprabodhini.com