बालविकास

Balvikas बालवयात होणारे संस्कार हे जन्मभर टिकतात. खरंतर शिकण्याचं – संस्कारित होण्याच वय म्हणून बालपणाकडे बघितले जाते. निरागस अशा बालपणात खेळीमेळीच्या वातावरणात खूप गोष्टी शिकता येतात. हि शिकवण अधिक मनोरंजक व आपलीशी व्हावी, यातून खर्‍या अर्थाने बालमनावर संस्कार व्हावेत, लहान मुलांमध्ये आत्मविश्‍वास वाढीस लागावा, बालकांमध्ये संवाद साधण्याची कला विकसित व्हावी, बालमनातील चिकित्सक वृत्ती अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी संस्थेतर्फे विविध प्रकल्प कार्यरत आहेत.

बालनाट्य शिबीर

मंगळवार, दि. 02/05/2017 ते मंगळवार 09/05/2017

मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी बालनाट्य शिबिर हे प्रभावी माध्यम आहे. त्यांच्यातील अविष्काराला हक्काचे व्यासपीठ यामुळे निर्माण झाले आहे. याच जाणिवेतून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध नाट्यकलावंत लक्ष्मी पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालनाट्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.

लक्ष्मी पिंपळे यांनी अभिनय म्हणजे काय? आणि भूमिकेतून साकारणारे जिवंत नाट्य यांविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. नवरसांचा नाट्यमयता निर्माण करण्यासाठी कसा वापर करता येतो यांविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. अभिनय करतांना देहबोली, आवाजातील चढउतार यांवर लक्ष केंद्रीत कसे करावे याबाबतही विविध प्रवेशातून मार्गदर्शन केले. अभिनय ही कला असून त्यातून मिळणारा आनंद नवे शिकविणारा असतो. प्रत्येकात कलावंत दडलेला असतो आणि त्याचा शोध घेण्याचे काम अशी शिबीरे करतात यावेळी लक्ष्मी पिंपळे यांनी ओमकार नाट्य शिबिरातून कसे व्यक्त व्हावे यांचे साभिनय प्रात्यक्षिक करून घेतले. त्यास शिबिरार्थींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिराचा समारोप प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर व सौ. ज्योती विश्वास ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला व शिबीरार्थींना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. याप्रसंगी मुलांनी सादरीकरणातून अभिनयाची चूणूक दाखवली. यात दिवाकरांच्या नाट्यछटा, गाढवाचं लग्न, प्राण्यांचं अद्भूत जग आणि त्यांची जगण्याची शैली, ‘ती फुलराणी’ मधील स्वगत, म्या बी शंकर हाय, या नाटिकेतील प्रवेशांचे सादरीकरण कविता वाचन प्रभावीपणे करण्यात आले.

पतंग व पझल्स तयार करण्याची कार्यशाळा

मार्गदर्शक : हेमंत नाखरे
गुरुवार, दि. 11/05/2017 ते शुक्रवार दि. 12/05/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हेमंत नाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पतंग तयार करणे’ व ‘पझल्स तयार करणे’ या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.

मुलांमध्ये असलेल्या अंगभूत कलागुणांना व कौशल्याला वाव मिळण्यासाठी सदर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. टाकाऊतून टिकाऊ व त्यातून शिकण्याची प्रक्रिया मुलांमध्ये निर्माण व्हावी व त्यातून कल्पनाशक्तीला योग्य दिशा मिळावी ह्या जाणीवेतून श्री.नाखरे हा उपक्रम राबवत असतात. विविध प्रकारच्या मटेरिअल्सपासून ‘पतंग’ व ‘पझल्स’ यातून शिकायला मिळाल्या. हेमंत नाखरे यांनी शैक्षणिक व अभ्यासू जाणिवेतून विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून सोप्या पद्धती वापरल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच अशा प्रकारच्या खेळांमुळे आनंद निर्माण होत असतो, याची प्रचिती विद्यार्थ्यांना आली.

इको फ्रेण्डली पतंग कशी करावी, ती कशी उडवावी याच्या शास्त्रशुद्ध टिपस नाखरे यांनी दिल्या. गुजरातमधील पतंगोत्सवातून निष्णात झालेले व 30 वर्षापासून पतंगाचे प्रशिक्षण देणारे हेमंत नाखरे यांनी जपानी, चायनीज आणि इंडीयन पतंगांची प्रात्याक्षिके सादर केली. गरूड, फुलपाखरू, कार्टून, बेबी काईट, इंद्रधनुष्य रंगाचे, घडी करून नेता येणारे पतंग, सुतळीच्या सहाय्याने उडणारे नऊ फुटी, कापडाचे सहा फुटी, रात्री दिवे लाऊन उडणारे असे विविध पतंग विद्यार्थ्यांना बघावयास मिळाले. हे पतंग अनेक वर्ष टिकतात. ते कसे उडवायचे, याचे गुपीत त्यांनी सांगितले. पझल्समधून विद्यार्थ्यांच्या बौद्धीक विकासाला चालना मिळण्यासाठी पझल्स तयार करणे हा उत्तम उपाय आहे. त्यातून बुद्धीला आव्हानात्मक खाद्य मिळत असते. व बुद्धीची चंचल होत असते.

ओरिगामी कार्यशाळा

मार्गदर्शक – हेमंत चोपडे
सोमवार, दि. 15/05/2017

कागदाचे विविध रंगांचे आकार आणि त्या आकारातून मनात दडलेल्या असंख्य मोरपंखी कलाकृती यांची अनोखी प्रचिती मुलांना अनुभवण्यास मिळाली. निमित्त होते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ओरिगामी कार्यशाळेचे प्रा.हेमंत चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व कल्पकतेला वाव देण्यासाठी मनोरंजक पद्धतीने सदर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

कागदापासून पंख हलवणारा पक्षी, सूर्यपक्षी, समारंभाप्रसंगीचा बॅच, होड्या, जहाज, मोर, ससा, सौरऊर्जा पंख, खुर्ची, टोपी, जेवणाचा डबा, फुलांचे विविध प्रकार अशा रोजच्या जगण्यातील वस्तू बनविण्याचे प्रात्यक्षिक करून उपस्थित मुलांकडून करून घेतले. ओरिगामी कलेचा इतिहास मनोरंजनातून संदेश देणे हा असून हसत खेळत आनंदमयी जीवन जगण्यासाठी ह्या कलेचा उपयोग करावा असे श्री.चोपडे म्हणाले.

ओरिगामी कला पर्यावरणपूरक असून कागदापासून पाहिजे तो आकार निर्माण करण्याचे कौशल्य यातून सहजरित्या करता येते. यासाठी सातत्य, सराव आवश्यक असून भूमितीय संकल्पना सोप्या पद्धतीने समजून देण्यासाठी ओरिगामी कला उपयुक्त असल्याचेही त्यांनी सांगितले.

टी.व्ही.चॅनेल्सच्या जमान्यात हरवत चाललेल्या क्रिएटीव्हीटीला अशा शिबिरातून निश्‍चित दिशा मिळेल. मुलांमधील उपजत कला व कौशल्याला वाव मिळण्यासाठी याचा उपयोग होतो. अभ्यासाबरोबर एखादा छंद जीवनात असावा त्यातून आनंद मिळत असतो. याप्रसंगी उपस्थित शिबिरार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

‘मैत्री गणिताशी’ कार्यशाळा

मंगळवार, दि. 23/05/2017 ते बुधवार दि.24/05/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मैत्री गणिताशी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

मैत्री गणिताशी कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व कल्पकतेला वाव देण्यासाठी मनोरंजक पद्धतीने सदर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. हेमंत चोपडे हे सदर कार्यशाळेचे मार्गदर्शक होते. गणिता विषयाची भीती घालविण्यासाठी साध्या व सोप्या पद्धतीने गणित शिकविण्याची पद्धत प्रा.हेमंत चोपडे यांनी विकसीत केली असल्याने यात त्रिमितीय वस्तुंची दुनिया, खेळ गणितीय सूत्रांशी, ओरिगामीतून भूमितीय संकल्पना, वैदिक गणित अशा गणिताशी निगडित संकल्पनांचे मार्गदर्शन करण्यात आले.

गणितातील सुत्रं, प्रमेय व ती सोडविण्यासाठी लागणारी पद्धत सुरुवातीला समजून घेणे महत्वाचे असते. सरावातून हे सहज शक्य होते. निरनिराळ्या प्रश्नपत्रिका, कोडी सोडविण्यातून गणिताविषयाची आवड निर्माण होते.

व्यक्तिमत्व विकास व नाट्य कार्यशाळा

मार्गदर्शक : संजय हळदीकर
गुरुवार, दि. 25/05/2017 ते सोमवार दि. 29/05/2017

मुला-मुलींच्या शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते, अभ्यासाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाटकासारखे प्रभावी माध्यम नाही. त्यातून देहबोली, सभाधीटपणा, संवाद कौशल्य, स्वतःला सादर कसे करावे, संघटन कौशल्य यांचा विकास होत असतो.

आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्यातील वेगळेपणाचा ठसा उमटवण्यासाठी प्रत्येकजण काळजी घेत असतो. आपले व्यक्तिमत्व चारचौघात वेगळेपणाने दिसावे यासाठी प्रत्येकाची धडपड असते त्यासाठी अशी शिबिरे मोलाची कामगिरी बजावतात. विविध सांघीक खेळ, एखादा विशिष्ट विषय देऊन त्यावर भाष्य करण्यास सांगणे, आपले आवडते पुस्तक आणि त्यातील आवडलेला उतारा वाचून दाखवणे, स्वगत सादर करणे, आवाजातील चढउतार, श्वासावर नियंत्रण ठेवणे अशा विविध विषयांवर संजय हळदीकर यांनी मार्गदर्शन केले. नाटक उभे करणे, नाटकाची तांत्रिक अंगे यांचाही कार्यशाळेत समावेश करण्यात आला होता.

विश्वास संकल्प आनंदाचा उपक्रमांतर्गत

‘शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा’
बुधवार, दि.10 जानेवारी 2018

मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील मुलांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा. त्यांच्यात निकोप स्पर्धा होऊन त्यांच्यात असलेले टॅलेंट सर्वांसमोर यावे. शालेय वयातच विद्यार्थ्यांना निसर्ग व पर्यावरणाकडे डोळसपणे पाहता यावे व त्यांची जाण वाढावी अशा विविध उद्देशांनी सदर चित्रकला स्पर्धा नाशिक शहरात आयोजित करण्यात आली आहे.

माहे जानेवारी-2018 या महिन्यात नाशिक शहरातील एकूण 55 मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली. ते 10 वी. च्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा संपन्न होत आहे. या स्पर्धेत एकूण 20,000 विद्यार्थी सहभागी होत असून स्पर्धेस दि. 10 जानेवारी 2018 रोजी पेठे विद्यालय, नवरचना इंग्लिश मिडीयम स्कूल, गंगापुर रोड, बालशिक्षण मदिर गोरेराम लेन, मराठा हायस्कूल, जनता विद्यालय गांधीनगर, लोकमान्य टिळक हायस्कुल गाडगे महाराज पुलाजवळ, मनपा शाळा क्र. 62, मनपा शाळा क्र. 50, उर्दु शाळा क्र.10, वाघ गुरुजी माध्यमिक विद्यालय इत्यादी शाळांमधून सुरुवात झाली आहे.

जादू वैदिक गणिताची’ कार्यशाळा

मार्गदर्शक – ललित डांगरे
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, विश्वास को-ऑप.बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमातर्गत सुप्रसिद्ध गणिततज्ज्ञ ललित डांगरे यांच्या ‘जादू वैदिक गणिताची’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन प्रतिष्ठानच्या सभागृहात करण्यात आले होते. वैदिक पद्धतीचा वापर करून जलद, अचूक व सोप्या पद्धतीने गणित सोडवता येते. त्याचबरोबर वैदिक गणितामध्ये कमी स्टेप असल्याने जलद गतीने कमीत कमी दहापट वेगाने गणित सोडवता येते. उदाहरणादाखल ललित डांगरे यांनी विद्यार्थ्यांकडून गणिते सोडवून घेतली, त्यातून विद्यार्थ्यांना शिकण्याचा अनोखा आनंद मिळाला. वैदिक गणित मनोरंजक असल्याने गणित सोडवण्याची भीती नाहिशी होते. वैदिक गणिताचा वापर करून साधारण विद्यार्थीसुद्धा गुणाकार, भागाकार, बेरीज-वजाबाकी, वर्ग, वर्गमुळ, घन, घनमुळ आश्‍चर्यकारक वेगाने सोडवतात. निरनिराळ्या प्रकारच्या पेपर सोडवण्याचा वेग महत्त्वाचा असल्याने त्या ठिकाणी ही पद्धत फारच उपयोगी ठरते. एकाग्रता वाढण्यास यामुळे मदत होते. याचे प्रात्याक्षिक निवडक विद्यार्थ्यांकडून त्यांनी करून घेतले, त्यास विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला.

सृजन उपक्रमातर्गत सृजन बालचित्रपट महोत्सव

सिनेमातून आपल्या मनातील भावनांचे प्रतिबिंब उमटत असते. आजुबाजूचे रोजचे विषय चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या जगण्याशी समांतर नातं सांगत असतात. त्यातून प्रबोधन होतेच व मनोरंजनातून सकारात्मक संदेशही मिळत असतो. तोच संदेश विचार जीवनाची अभिरुची वाढवत असतो, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र, नाशिकचे अध्यक्ष विनायकदादा पाटील यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक,विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सृजन’ उपक्रमांतर्गत ‘सृजन बालचित्रपट महोत्सवा’चे उद्घाटन विजयानंद थिएटर (भद्रकाली रोड, गाडगे महाराज पुतळ्याजवळ, नाशिक) येथे झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अभिनेते, दिग्दर्शक सचिन शिंदे, प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर, अखिल भारतीय नाट्यपरिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा.रवींद्र कदम, वाय.डी. बिटको गर्ल्स हायस्कूलचे उपमुख्याध्यापक बाळकृष्ण रायजादे व पर्यवेक्षिका मेघना गायधनी आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाचे उद्घाटन विद्यार्थीनींच्या हस्ते क्लॅप दाबून झाले व शुभारंभ क्रांती कानडे दिग्दर्शित ‘महक मिर्झा’ या बालचित्रपटाने करण्यात आला. सचिन शिंदे म्हणाले की, मुलांच्या सृजनशीलतेला, कल्पकतेला व्यासपीठ देण्यासाठी चित्रपट माध्यम प्रभावीपणे काम करते. यातील आविष्कार नवे जग तर दाखवतोच त्याचबरोबर चित्रपटाची भाषा प्रत्येकाला आपलीशी वाटते हे या माध्यमाचे यश आहे. विविध चॅनेल्सने मुलांसाठी दर्जेदार कार्यक्रम निर्मिती करावी, असेही ते म्हणाले.विश्वास ठाकूर म्हणाले की, प्रतिष्ठानतर्फे मुलांमधील अंगभूत गुणांना, कलाकौशल्याला निश्‍चित दिशा देर्‍यासाठी अभिरुची संपन्न पिढी घडवण्यासाठी प्रबोधनपर बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. माहिती व तंत्रज्ञानाला कला माध्यमाची जोड देणे म्हणजे सृजनशीलतेला नवी दिशा देणारे आहे. महोत्सवात मंगळवार 17 फेब्रुवारी 2015 रोजी अपूर्व किशोर बीर दिग्दर्शित ‘बाजा’ (माऊथ ऑर्गन), बुधवार 18 फेब्रुवारी 2015 रोजी अजय कार्तिक दिग्दर्शित ‘करामती कोट’, गुरुवार 19 फेब्रुवारी 2015 रोजी अरुण खोपकर दिग्दर्शित ‘हाथी का अंडा’, शुक्रवार 20 फेब्रुवारी 2015 रोजी श्रीधर रंगायन दिग्दर्शित ‘ये है यकूड बकूड बंब बो’ व शनिवार 21 फेब्रुवारी 2015 रोजी जयश्री कनाल दिग्दर्शित ‘कट्ट कट्ट कड कट्टू’ हे चित्रपट दाखविण्यात आले.

सृजन बालचित्रपट महोत्सव ‘सिनेमाची भाषा’ या विषयावर कार्यशाळा

व्याख्याते – सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुधीर कुलकर्णी
अनुभवातून प्रसंगाचे बीज रोवते व त्याचे कथेत रुपांतर होते. कल्पशक्तीच्या आधारे दृश्यमाध्यमाची निर्मिती होते. त्यानंतर सिनेमाची भाषा तयार होते. ती भाषा रसिकाला आपलीशी वाटते. चित्रपट ही लोकाभिमुख कला असून चित्र, शिल्प, संगीत, नाट्य यांचे प्रतिबिंब चित्रपट कलेत प्रकर्षाने उमटलेले असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुधीर कुलकर्णी यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडिया, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सृजन’ उपक्रमांतर्गत ‘सृजन बालचित्रपट महोत्सवात ‘सिनेमाची भाषा’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, जुने सिडको, नाशिक येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. चित्रपट कलेत आरंभ, मध्यम व शेवट या तीन महत्त्वाच्या घटना असून कल्पना आणि वास्तवाचे मिश्रण यात असते. कोणाची गोष्ट, कुठे घडली, काय, केव्हा, कसं घडलं या सूत्राशी निगडित चित्रपटाचे कथानक असते.

सृजन बालचित्रपट महोत्सव ‘सिनेमाचे तंत्र व छायाचित्रण’ या विषयावर कार्यशाळा

व्याख्याते – सुप्रसिद्ध दिग्दर्शक व कॅमेरामन प्रवीण पगारे
सिनेमाचे तंत्र हे चित्रपटाच्या आशयाला पूरक अशी प्रक्रिया असून त्या माध्यमातून सिनेमाचा विषय व त्यातील परिणामकारकता रसिकांना कथानकातून नवा विचार देते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध दिग्दर्शक व कॅमेरामन प्रवीण पगारे यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडिया, विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सृजन’ उपक्रमांतर्गत ‘सृजन’ बालचित्रपट महोत्सवात ‘सिनेमाचे तंत्र व छायाचित्रण’ या विषयावरील कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. एकलव्य रेसीडेशिअल स्कूल, पेठ रोड, नाशिक येथे सदर कार्यशाळा संपन्न झाली. त्याप्रसंगी प्रवीण पगारे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कॅमेऱ्यामागे दिग्दर्शकाचा विचार असतो आणि तो पडद्यावर आणण्यासाठी प्रसंगानुरूप स्थळे, दृश्ये यांची सांगड घालणे गरजेचे असते. सभोवतालच्या घडणाऱ्या घटनांची जाणीव छायाचित्रणातून व्यक्त होण्यास मदत होत असते. कॅमेरातून चित्रपटाचा आशय गडद होण्यास अधिक मदत होत असते. यावेळी त्यांनी भारतीय व जागतिक चित्रपटातील छायाचित्रणांच्या वेगळेपणाचा वेध घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून विषय देऊन त्यावर छोटीशी फिल्म तयार केली व त्यातील साऊंड एडिटिंग या तांत्रिक विषयांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव गावीत यांनी केले. सन्मान प्राचार्य अशोक बच्छाव यांनी केला.

कागदी होड्या बनविण्याची प्रात्यक्षिक कार्यशाळा

मार्गदर्शक: श्री.मधुकर आठल्ये – दि.29/05/2013
प्रत्येकाने अभ्यासाबरोबरच कुठला ना कुठलातरी छंद जोपासायला हवा. त्यातून व्यक्तिमत्व विकासाबरोबरच मन प्रसन्न राहण्यास मदत होते. आपल्याजवळ असलेल्या कलेला विकसित करा व त्यात यशस्वी व्हा. कमी खर्चातील छंद म्हणून होड्या बनविण्याची कला नव्या पिढीने पुढे न्यायला हवी. असे मत सुप्रसिद्ध ओरिगामी कलाकार व ‘होड्याच होड्या’ या पुस्तकाचे लेखक मधुकर आठल्ये यांनी केले. मधुकर आठल्ये यांनी होड्यांच्या गमतीदार जन्मकथा व होड्या बनविण्याच्या साध्या, सोप्या पद्धती सांगत उपस्थित विद्यार्थ्यांकडून होड्या बनवून घेतल्या. त्यात होडकं, शिकारा होडी, काळू-बाळू होडी, रॉकेट होडी, भरारी होडी, मयूरपंखी होडी, नाग होडी, म्हातारीचा बुट होडी, तरते रंगमंच होडी, फुलपाखरु होडी, राजा-राणी होडी, सुळकाशीड होडी, विहंग होडी अशा विविध प्रकारच्या होड्यांचा समावेश होता.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण विभागीय केंद्र-नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, रेडिओ विश्‍वास 90.8 व विश्वास को-ऑप बँक नाशिकच्या संयुक्त विद्यमाने ‘कागदी होड्या बनविण्याची प्रात्यक्षिक कार्यशाळा’ संपन्न झाली. या कार्यशाळेस बालगोपालांचा उदंड प्रतिसाद लाभला.

बालनाट्य शिबीर

डॉ.प्रशांत वाघ
विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक डॉ.प्रशांत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बालनाट्य शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिबिरार्थींनी रामनाथ माळोदे लिखित ‘बेनटेन आला मेथीच्या लग्नाला’, धनंजय सरदेशपांडे लिखित ‘चमचम चमको’, सई परांजपे लिखित ‘भटक्याचे भविष्य’ ह्या नाटिकांचे सादरीकरण केले. सहभागी शिबिरार्थींना प्रमाणपत्राचे वाटप विश्वास को-ऑप.बँकेचे उपाध्यक्ष विलास हावरे यांच्या हस्ते करण्यात आले. बालनाट्य शिबिरात मोठ्या सं‘येने शिबिरार्थी सहभागी झाले होते.

ओरिगामी कार्यशाळा

डॉ. हेमंत चोपडे
प्रा.हेमंत चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ओरिगामी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कागदापासून पंख हलवणारा पक्षी, सूर्यपक्षी, समारंभाप्रसंगीचा बॅच, होड्या, जहाज, मोर, ससा, सौरऊर्जा पंख, खुर्ची, टोपी, जेवणाचा डबा, फुलांचे विविध प्रकार अशा रोजच्या जगण्यातील वस्तू बनविण्याचे प्रात्यक्षिक करून उपस्थित मुलांकडून करून घेतले. ओरिगामी कला पर्यावरणपूरक असून कागदपासून पाहिजे तो आकार निर्माण करण्याचे कौशल्य यातून सहजरित्या करता येते. यासाठी सातत्य, सराव आवश्यक असून भूमितीय संकल्पना सोप्या पद्धतीने समजून देण्यासाठी ओरिगामी कला उपयुक्त असल्याचे प्रा.हेमंत चोपडे यांनी सांगितले. कार्यशाळेस मोठ्या संख्येने शिबिरार्थी सहभागी झाले होते.

मैत्री गणिताची कार्यशाळा

डॉ. हेमंत चोपडे
विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मैत्री गणिताशी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व कल्पकतेला वाव देण्यासाठी मनोरंजक पद्धतीने सदर कार्यशाळेत. प्रा.हेमंत चोपडे यांनी मार्गदर्शन केले. गणित विषयाची भीती घालविण्यासाठी साध्या व सोप्या पद्धतीने गणित शिकविण्याची पद्धत प्रा.हेमंत चोपडे यांनी विकसित केली आहे. यात त्रिमितीय वस्तूंची दुनिया, खेळ गणितीय सूत्रांशी, ओरिगामीतून भूमितीय संकल्पना, वैदिक गणित अशा गणिताशी निगडित संकल्पनांचे मार्गदर्शन करण्यात आले. गणित हा विषय मनोरंजक व हसतखेळत पद्धतीने शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग या कार्यशाळेत मिळाला.

बालविवाह एक समस्या व त्यावरील उपाय

नाशिकच्या एम. एस. डब्यू. कॉलेजने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बालविवाह एक समस्या व त्यावरील उपाय या विषयांवर कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा विश्वास ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने श्रीमती अनिता पगारे यांनी घेतली. महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या 100 ते 110 विद्यार्थांनी या कार्यशाळेत सक्रीय सहभाग घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

एन.जी.ओ. फोरम बैठक

नाशिक शहर आणि परिसरात काम करणार्‍या सामाजिक संस्थांचे एन.जी.ओ. फोरम नावाने एक नेटवर्क आहे. हे नेटवर्क अधिक सक्षम आणि परस्परांना पूरक व्हावं यासाठी विश्वास ज्ञान प्रबोधिनीने फोरमच्या बैठकीचे आयोजन केले होते. 20 ते 23 संस्था, संघटनांच्या प्रमुखांनी या बैठकीत भाग घेतला. उपस्थित प्रतिनिधी व त्यांच्या संस्थांचा परिचय या बैठकीत करून देण्यात आला. नियमित संपर्कासाठी उपस्थितांचा एक व्हाट्स अप ग्रुप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रबोधिनीच्या अनिता पगारे यांनी हा व्हॉट्सऑप ग्रुप केला. बालभिक्षेकरी निर्मूलनासाठी नागरिकांच्या जागृतीसाठी अभियानाचे आयोजन व्हावे असे चर्चेअंती ठरविण्यात आले. मुलांसाठी काम करणारी चाईल्ड लाईन या कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वांना त्यात सहभागी करून घेईन असे ठरले. सामाजिक संस्थांच्या कामाचा परिचय शहरवासियांना व्हावा यासाठी संस्था प्रमुखांच्या मुलाखतीद्वारे कामाची माहिती देणारे सदर रेडिओ विश्वास 90.8 समुदाय रेडिओ घेऊ शकते अशी घोषणा विश्वास ठाकूर यांनी केली. याच्या अंमलबजावणीची जबाबदारी रेडिओ समन्वयक राजेश हिवरे यांच्यावर सोपविण्यात आली.

आम्हाला अनुसरण करा

संपर्क कार्यालय

location-icon
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक
निरज हाईट्स, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३ (महाराष्ट्र)
fax-icon
०२५३ - २३०५६०५
time-icon
info@vishwasdynanprabodhini.com