Radio Vishwas Logo

संस्थेविषयी

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक ही सामाजिक संस्था दि. 31 मार्च 2000 रोजी सामाजिक व सहकार क्षेत्रातील विविध उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी स्थापन झालेली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक: महाराष्ट्र/6765/2000/नाशिक असा आहे. ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या मागास तसेच सामाजिक दृष्ट्या दुर्लक्षित व वंचित घटकांचा सर्वांगाने विकास साधण्यासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी संस्था कार्यरत आहे. यासाठी सहकारातून सामाजिक विकास हे संस्थेचे धोरण आहे. सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे श्री. विश्वास ठाकूर यांनी आपल्या सहकार्‍यांसह संस्थेची स्थापना केली आहे.

उद्देश

संशोधन व प्रशिक्षण हा समाज परिवर्तनाचा पाया आहे यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. अपेक्षित समाज परिवर्तनासाठी महत्त्वाच्या व गरजेच्या विषयांवर योग्य वेळेत संशोधन झाले पाहिजे. तसेच या संशोधनाच्या आधारावर निश्‍चित कालावधीत प्रकल्प तयार करून ते पूर्ण केले पाहिजेत. जेणेकरून विकासाचे मुद्दे पडून न राहाता मार्गी लागतात व समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला त्यामुळे खरा हातभार लागतो. याच विचाराने मुख्यत्वे सामाजिक व सहकार क्षेत्रातील विविध मुद्दे घेऊन विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट काय करीत आहे. समाजातील मुख्य प्रवाहातील घटकांसोबतच प्रामुख्याने दुर्लक्षित व वंचित घटकांचा सर्वांगाने विकास साधणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे.

कार्यक्रम समिती

kailas kamod

अध्यक्ष

डॉ. कैलास शंकरराव कमोद

Dipali Mankar.png

सदस्य

सौ. दिपाली अशोक मानकर

Smita Gaydhani

सदस्य

सौ. स्मिता सतिष गायधनी

Sudha Mehata

सदस्य

सौ. सुधा सुनिल मेहता

Mangesh Panchashari

सदस्य

श्री. मंगेश कमलाकर पंचाक्षरी

Usha Karpe

सदस्य

श्रीमती उषा हेमंत कर्पे

Manoj Shimpi

सदस्य

डॉ. मनोज एकनाथ शिंपी

Manisha Jagatap

सदस्य

डॉ. मनिषा आधार जगताप

Lata Bendakule

सदस्य

सौ. लता बाबुराव बेंडकोळी

Sangeeta Pataki

सदस्य

सौ. संगिता पत्कि

Archana Patil

सदस्य

सौ. अर्चना संजय पाटिल

 

रेडिओ विश्वास ९०.८ (समुदाय रेडिओ)

radio vishwas 90.8प्रसार माध्यमांमध्ये समाज घडविण्याची ताकद आहे. यासाठी ही प्रसारमाध्यमे समुदायाच्या नियंत्रणात असली पाहिजे व त्याद्वारे समुदायाच्या मूलभूत प्रश्‍नांवर बोलले गेले पाहिजे. समुदाय विकास व त्याद्वारे सामाजिक विकास हे ध्येय समोर ठेवून रेडिओ विश्वास 90.8- समुदाय रेडिओ कार्यरत आहे. समुदायाच्या विकासासंबंधी विविध कार्यक्रम निर्मिती व त्याचे प्रसारण तसेच या निर्मिती व प्रसारणामध्ये समुदायातील प्रतिनिधींचा मुख्य सहभाग ही समुदाय रेडिओची नाविन्यपूर्ण प्रक्रिया येथे कार्यरत आहे. रेडिओचे तंत्र शिकवून समुदायातील व्यक्तींचा आवाज बुलंद करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.

सामाजिक विकासाचे प्रभावी माध्यम कम्युनिटी रेडिओ’ व्याख्यान

सामाजिक विकासाचे प्रभावी माध्यम कम्युनिटी रेडिओ’ या विषयावर एचपीटी महाविद्यालयाच्या वृत्तपत्र व जनसंपर्क विभागात संस्थेने व्याख्यान आयोजित केले होते. यामध्ये विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे समन्वयक राजेश हिवरे व्याख्याते म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी समुदाय रेडिओविषयीची संकल्पना स्पष्ट केली. रेडिओ विश्वास 90.8 समुदाय रेडिओ मार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यांमध्ये जाणीव सामाजिकतेची, स्वांत सुखाय, नाशिक रॉक्स, आजीच्या गोष्टी, पंचायत राज, घराभोवतालची बाग व लेडीज कट्टा या समुदायाच्या सहभागातून चालविलेल्या उपक्रमांची ओळख उपस्थितांना करून दिली. तसेच रेडिओ कार्यक्रम निर्मितीसाठी प्रस्तावाची आखणी कशी करावी याविषयी सादरीकरण केले. यात पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, माहितीपट व लघुपट अशा विविध साधनांचा वापर केला. यावेळी राजेश हिवरे यांनी कोणतेही माध्यम वापरताना ते साधन म्हणून बघितले पाहिजे. तर साध्य म्हणून आपण देत असलेला संदेश व त्यातून अपेक्षित बदल याकडे बघितले पाहिजे, असे केल्यास आपण माध्यमात न अडकता बदलाच्या प्रक्रियेवर अधिक लक्ष केंद्रित करतो, ही काळजी माध्यमकर्मीने घेणे गरजेचे असते असे सागितले.

समुदाय रेडिओ कार्यशाळा

जाणीव सामाजिकतेची उपक्रमातर्गत संस्थेच्या सभागृहात कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. त्यात विविध स्कूल कम्युनिटीसाठी वेगवेगळ्या सत्रांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात मनपा शाळा क्र.56-मुले व मनपा शाळा क्र.67-मुली (फुले नगर, नाशिक), आनंद निकेतन (पाईपलाईन रोड, गंगापूर रोड, नाशिक), नूतन प्राथमिक विद्यालय (गरवारे, अंबड, नाशिक), दिशा उपक्रम (विश्वास लॉन्स, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक), पाच बंगला प्राथमिक शाळा (खांडरे मळा, नाशिकरोड) व मनपा शाळा क्र.7-मुली व मनपा शाळा क्र.29-मुले (मखमलाबाद नाका, नाशिक) या शाळा सहभागी झाल्या. यावेळी रेडिओ जॉकी सोहम शहाणे यांनी प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शब्दोच्चार आणि समयसूचकता यांचे महत्त्व रेडिओ जॉकीसाठी किती उपयुक्त आहे हे त्यांनी विशद केले. या क्षेत्रात करिअरसाठी भरपूर संधी असल्याचेही त्यांनी सांगितले. रेडिओ विश्वासच्या निवेदिका पूनम पाटील यांनी रेडिओचे ऑन एअर शेड्युलिंग, स्टुडिओची माहिती, रसिकांना आवडणारे कर्यक्रम व त्याचा प्रतिसाद याविषयी अनुभव कथन केले. रसिकांच्या प्रतिसादामुळे कार्यक्रमामध्ये कशी विविधता आणता येते याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. रेडिओ विश्वासचे समन्वयक राजेश हिवरे म्हणाले की, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांना आपले प्रश्न व नवनवीन संकल्पना मांडण्यासाठी पर्यायी व हक्काचे व्यासपीठ म्हणून रेडिओ विश्वासने पुढाकार घेतला आहे त्या माध्यमातून संस्थांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. तरी यात जास्तीत जास्त संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

समुदाय रेडिओ एक प्रभावी माध्यम’ विषयावर परीसंवाद मविप्र संस्थेचे समाजकार्य महाविद्यालयात संपन्न

‘समुदाय रेडिओ एक प्रभावी माध्यम’ या विषयावर मविप्र संस्थेचे समाजकार्य महाविद्यालय नाशिक या ठिकाणी परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यांमध्ये विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युटच्या विश्वस्त दिपाली मानकर व रेडिओ विश्वास 90.8 समुदाय रेडिओचे समन्वयक राजेश हिवरे प्रमुख व्याख्याते म्हणून तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख होते. तसेच प्राध्यापिका चंद्रप्रभा निकम उपस्थित होत्या. सदरील कार्यक्रम हा समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला. परीसंवादामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना दिपाली मानकर यांनी समुदाय रेडिओ विषयीची संकल्पना स्पष्ट केली. यावेळी त्या म्हणाल्या समुदाय रेडिओ म्हणजे समुदायाच्या सहभागातून समुदायासाठी चालविला जाणारा रेडिओ होय. यात समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील सहभागी होऊन त्यांचे अनुभव, निरीक्षणे व सामाजिक संस्थांविषयीचा दृष्टीकोन आणि अभ्यास हा कार्यक्रमाच्या माध्यमातुन व्यक्त करु शकतो. परीसंवादाच्या पुढील सत्रात राजेश हिवरे यांनी रेडिओ विश्वास 90.8 समुदाय रेडिओ मार्फत चालविल्या जाणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली. यांमध्ये जाणीव सामाजिकतेची, स्वांत सुखाय, नशिक रॉक्स, आजीच्या गोष्टी, पंचायत राज, घराभोवतालची बाग व लेडीज कट्टा या समुदायाच्या सहभागातुन चालविलेल्या उपक्रमांची ओळख उपस्थितांना करुन दिली. तसेच रेडिओ कार्यक्रम निर्मीतीसाठी प्रस्तावाची आखणी कशी करावी याविषयी सादरीकरण केले. यात पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, माहितीपट व लघुपट अशा विविध साधनांचा वापर करुन सदर परीसंवाद खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी राजेश हिवरे यांनी ‘‘कोणतेही माध्यम वापरतांना ते साधन म्हणून बघीतले पाहीजे. तर साध्य म्हणून आपण देत असलेला संदेश व त्यातुन अपेक्षीत बदल याकडे बघीतले पाहीजे, असे केल्यास आपण माध्यमात न अडकता बदलाच्या प्रक्रीयावर अधिक लक्ष केंद्रीत करतो, हि काळजी माध्यमकर्मीने घेणे गरजेचे असते.’’ समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समुदाय रेडिओच्या माध्यमातुन रोजगाराच्या संधींचा शोध घ्यावा व आपल्या सामाजिक कारकिर्दीला सुरुवात करावी असे आवाहन विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट मार्फत करण्यात आले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन व आभार समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आले.

साऊंड एडिटिंग कार्यशाळा (दि.22 ते 24 मे 2015)

आजच्या स्पर्धेच्या काळात सतत तणावाखाली असल्याने आपले स्वतःचे छंद, आवड जोपासणे जनसामान्यांना दिवसेंदिवस अशक्य होत आहे. अशा परिस्थितीत आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाला पूरक अशा साऊंड एडिटिंग या विषयात आवड असणार्‍यांना ‘साऊंड एडिटर’ बनण्याची व प्रशिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कामाची संधी उपलब्ध करुन देण्याकरिता विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ‘साऊंड एडिटिंग’ प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. सदर प्रशिक्षण नाशिक येथे दि.22 ते 24 मे 2015 या कालावधीत संपन्न झाले. ‘साऊंड एडिटिंग’ प्रशिक्षणात रेडिओ कार्यक्रमाचे निर्मिती संदर्भात साऊंड एडिटिंग संकल्पना समजावून घेणे, साऊंड एडिटिंग कौशल्यांचा अभ्यास करणे, रेडिओ कार्यक्रमांचे प्रोमो तयार करणे, साऊंड एडिटिंग सॉफ्टवेअरची ओळख व प्रात्यक्षिक, सृजनशील साउंड एडिटिंग कसे करावे हे शिकविण्यात आले व कार्यशाळेदरम्यान रेडिओ विश्वास 90.8 ला भेट देऊन चिकित्त्सक अभ्यास करण्यात आला.

रेडिओ जॉकी कार्यशाळा (दि.29 ते 31 मे 2015)

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रेडिओ जॉकी’ कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळा क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास बँकेच्या समोर, सावरकर नगर, गंगापूर रोड नाशिक येथे दि.29 ते 31 मे 2015 या कालावधीत पार पडली. सदर कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून संस्थेचे तज्ज्ञ प्रशिक्षक राजेश हिवरे व रेडिओ विश्वास येथील रेडिओ जॉकी धनश्री धारणकर व सोहम शहाणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये रेडिओ जॉकी संकल्पना समजून घेणे, रेडिओ जॉकी व निवेदक यातील फरक, इन्फोटेनरची भूमिका, रेडिओ जॉकीसंदर्भातील विविध कौशल्यांचा अभ्यास करणे, सृजनशील रेडिओ जॉकी म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, प्रात्यक्षिकांद्वारे स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवावा व व्हाईस मॉड्युलेशन आदी विषयांवर मान्यवरांनी सत्रे घेतली. प्रशिक्षणादरम्यान रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ येथे भेट देऊन प्रशिक्षणार्थींकडून सराव करवून घेण्यात आला. तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थीला व्यक्तिगत फिडबॅक देण्यात आला.

रेडिओ जॉकी कार्यशाळा (दि.18 ते 20 डिसेंबर 2015)

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रेडिओ जॉकी’ कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळा क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास बँकेच्या समोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दि.18 ते 20 डिसेंबर 2015 या कालावधीत पार पडली. सदर कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून संस्थेचे तज्ज्ञ प्रशिक्षक राजेश हिवरे व रेडिओ जॉकी कृपानंद जाधव व सोहम शहाणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये रेडिओ जॉकी व निवेदक यातील फरक, इन्फोटेनरची भूमिका, रेडिओ जॉकी संदर्भातील विविध कौशल्यांचा अभ्यास करणे, सृजनशील रेडिओ जॉकी म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, प्रात्यक्षिकांद्वारे स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवावा व व्हाईस मॉड्युलेशन आदी विषयांवर मान्यवरांनी सत्रे घेतली. शिक्षणादरम्यान रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ येथे भेट देऊन प्रशिक्षणार्थींकडून सराव करवून घेण्यात आला.

विद्यार्थ्यांसाठी रेडिओ जॉकी कार्यशाळा (दि.25 ते 27 मार्च 2016)

वर्षभर शालेय वातावरणामुळे स्वतःचे छंद व आवड याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना या उन्हाळी सुट्यांमध्ये ‘रेडिओ जॉकी’ प्रशिक्षणाची संधी संस्थेने उपलब्ध करून दिली. दि.25 ते 27 मार्च 2016 या कालावधीत ‘रेडिओ जॉकी कार्यशाळा’ सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात संपन्न झाली. रेडिओ जॉकी संदर्भातील विविध कौशल्यांचा अभ्यास करणे, रेडिओ जॉकी म्हणून आवश्यक आवाजाचे चढ-उतार व गती यांचा सखोल अभ्यास करणे, सृजनशील रेडिओ जॉकी म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, प्रात्यक्षिकांद्वारे स्वतःचा आत्मविश्वास वाढविणे यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान रेडिओ विश्वास 90.8 ला भेट देऊन विद्यार्थ्यांनी चिकित्सक अभ्यास केला. शिकण्याची आवड असणारे वय वर्षे 10 ते 18 च्या पुढील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

कम्युनिटी रेडिओ विषयावर व्याख्यान

‘सामाजिक विकासाचे प्रभावी माध्यम कम्युनिटी रेडिओ’ या विषयावर के..व्ही.एन. नाईक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीर उमराळे बुद्रुक येथे संस्थेने व्याख्यान आयोजित केले होते. विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे समन्वयक राजेश हिवरे प्रमुख व्या‘याते म्हणून उपथित होते. यावेळी ते म्हणाले, समुदाय रेडिओ म्हणजे समुदायाच्या सहभागातून समुदायासाठी चालविला जाणारा रेडिओ होय. प्रसार माध्यमांमध्ये समाज घडविण्याची ताकद आहे. यासाठी ही प्रसारमाध्यमे समुदायाच्या नियंत्रणात असली पाहिजे व त्याद्वारे समुदायाच्या मूलभूत प्रश्‍नांवर बोलले गेले पाहिजे. समुदाय विकास व त्याद्वारे सामाजिक विकास हे ब्रीद घेऊन समुदाय विकासासंबंधी विविध कार्यक्रम निर्मिती व प्रसारणांमध्ये समुदायातील प्रतिनिधींचा मुख्य सहभाग ही कम्युनिटी रेडिओची नावीन्यपूर्ण प्रक्रिया आहे. त्यांनी समुदाय रेडिओ विषयीची संकल्पना स्पष्ट केली.

रेडीओ विश्वास 90.8 समुदाय रेडीओ

नाशिक शहर आणि आसपासच्या परिसरातील समुदायांसाठी चालविला जाणारा रेडीओ. समाजाला सर्व प्रकारचे ज्ञान तसेच आवश्यक माहिती मिळावी यासाठी विविध विषयावर तज्ञाच्या मुलाखती, माहितीपर कार्यक्रम याद्वारे प्रसारित केले जातात. सर्व वयोगटांसाठी विविध कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते. साधारण 10 ते 12 लाख लोकसंख्येचा परिसर या रेडीओ मार्फत कव्हर केला जातो.

समुदाय रेडिओ- रेडिओ विश्वास ९०.८ विषयी

प्रसारमाध्यमांमध्ये समाज घडविण्याची ताकद आहे. यासाठी ही प्रसारमाध्यमे समुदायाच्या नियंत्रणात असली पाहिजे व त्याद्वारे समुदायाच्या मुलभूत प्रश्‍नांवर बोलले गेले पाहिजे. समुदाय विकास व त्याद्वारे सामाजिक विकास हे ध्येय समोर ठेवून समुदाय रेडिओ- रेडिओ विश्वास 90.8 कार्यरत आहे. समुदायाच्या विकासासंबंधी विविध कार्यक्रमनिर्मिती व त्याचे प्रसारण तसेच या निर्मिती व प्रसारणामध्ये समुदायातील प्रतिनिधींचा मुख्य सहभाग ही समुदाय रेडिओची नाविन्यपूर्ण प्रकि‘या येथे कार्यरत आहे. रेडिओचे तंत्र शिकवून समुदायातील व्यक्तींचा आवाज बुलंद करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.

 

मुख्य रेडिओ कार्यक्रम

 • 1. मुझे पंख दे दो...
 • 2. स्वांतःसुखाय
 • 3. जिज्ञासा मनामनाची
 • 4. विश्वास स्पोर्ट्स क्लब
 • 5. आजीच्या गोष्टी
 • 6. बाळू ऑन एअर
 • 7. वैज्ञानिक कुतूहल
 • 8. मेरे जीवन का गीत
 • 9. नाशिक रॉक्स
 • 10. लेडीज कट्टा
 • 11. आमची संस्था
 • 12. भारत भ्रमंती
 • 13. तयारी स्पर्धा परिक्षांची
 • 14. माझी कविता
 • 15. मैत्र कट्टा
 • 16. तनिष्कांच्या भावविश्वात
 • 17. जाणिव सामाजिकतेची
 • 18. नातवंडांशी गप्पा
 • 19. पुस्तकाच्या पानातून
 • 20. स्वच्छतादूत
 • 21. शहरी परसबाग
 • 22. कायद्याच्या चौकटीतून
 • 23. लढाई कॅन्सरशी
 • 24. कंट्रोल रुम
 • 25. काय वाटतं बोला! लाईव्ह शो

1) मुझे पंख दे दो...

muzhe-pankha-de-do महिलांचे सबलीकरण, शोषित, पिडीत महिलांचे भावविश्व जाणून घेण्याच्या उद्देशाने ‘मुझे पंख दे दो’ या कार्यक्रमाची निमिर्ती करण्यात आली. कार्यक्रमांच्या माध्यमातून मानसिक, शारीरिक जाच असलेल्या, स्वकीयांकडून तसेच आप्तांकडून मिळालेल्या हिन वागणूकीमुळे कोलमडून पडलेल्या स्त्रियांना आत्मसन्मानाचे आणि निर्भरतेचे पंख देण्याचे महत्त्वपूर्ण काम सामाजिक कार्यकर्त्या सौ. निता कोठेकर या कार्यक्रमामार्फत पार पाडतात. आतापावेतो अनेक शोषित आणि वंचित स्त्रियांनी सहभाग घेतला असून त्यांच्या तोंडून त्यांना मिळालेल्या वागणुकीचे, त्रासाचे, विवंचनेचे जे दर्शन होते त्याने कुणाही सामान्य माणसाचे हृदय हेलावून गेल्याशिवाय राहत नाही. सदर कार्यक्रमामुळे अशा पिडीत महिलांची कहाणी समाजापुढे आणण्यात मोठाच हातभार लागला आहे. आणि हा कार्यक्रम ऐकून अनेक स्त्रियांनी त्यांच्यावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संपर्क साधला आहे.

2) स्वांतःसुखाय

swantsukhay उत्तम आरोग्य एक प्रकारची संपत्तीच असते. आरोग्य उत्तम असेल तर कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करता येते आणि त्यायोगे मनः स्वास्थही ठिक राहते. आरोग्यविषयक, जागरुकतेची तसेच अनेक आजारांचे मूळ, लक्षणे व त्यावरील उपचारांची माहिती समाजाला व्हावी या सामाजिक उद्देशातून स्वांतःसुखाय अर्थात हेल्थ इज वेल्थ या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. नाशिकमधील सुप्रसिद्ध, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, सर्जन्स यांना या कार्यक्रमात आमंत्रित केले जाते. डॉ. मनोज शिंपी आणि डॉ.मिलिंद कौशिक हे हा कार्यक्रम सादर करतात व जनसामान्याना आरोग्य विषयी पडणाऱ्या मुलभूत प्रश्नांना या कार्यक्रमात अभ्यासपूर्ण रितीने सादर करतात. अतिशय नीटनेटका व आरोग्यविषयक माहितीने पुरेपूर भरलेला हा रेडिओ विश्वास 90.8 वरील एक लोकप्रिय कार्यक्रमआहे. कार्यक्रमात आतापर्यंत अनेक नामवंत डॉक्टर्सनी भेट दिली असून त्यांचे अनुभवी मार्गदर्शन व आरोग्य विषयक उपचार पद्धती याचा यथोचित लाभ स्वांतसुखाय या कार्यक्रमार्फत समाजाला होत आहे. स्वांतसुखाय हा कार्यक्रम दर रविवारी दुपारी १:०० वाजता प्रसारीत केला जातो.

3) जिज्ञासा मनामनाची

jdnyasa-manamanchi आपण आपल्या आजुबाजूला बघितले तर आढळते की, इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून आपले इप्सित साध्य केलेल्या, ध्येयवेड्या आणि कल्पकतेने अडचणीतून मार्ग काढून यशोशिखरावर पोहोचलेल्या व सामान्य लोकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या असामान्य व्यक्ती दिसतात. त्यांच्यातील असामान्यत्वामागचा शोध आणि एक प्रकारची जिज्ञासा यातून जिज्ञासा मनामनाची ह्या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. श्री. मंगेश पंचाक्षरी हा कार्यक्रम त्यांच्या खास शैलीत सादर करतात. कार्यक्रमात आजपर्यंत अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला आहे त्यामध्ये लेखक, कवी, तंत्रज्ञ, डॉक्टर्स, इंजिनियर, पोतराज, लोककलाकार इ. विविध क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.

4) विश्वास स्पोर्ट्स क्लब

vishwas-sport-club आपल्या आजुबाजूला अनेक क्रीडा प्रकार उपलब्ध आहेत. आपल्या भारत देशात ही विविध क्रीडा प्रकारांचा गौरवशाली इतिहास आहे. विविध दिग्गज खेळाडूंनी संबंधित क्रीडा प्रकारात नैपुण्य प्राप्त करून भारताचा झेंडा सीमेपलीकडे फडकवला आहे. या कार्यक्रमाच्या निर्मितीमागे समाजातील लोकांमधे खेळाची आवड निर्माण करून त्यांना विविध क्रीडा प्रकारांची माहिती व्हावी या उद्देशाने विश्वास स्पोर्टस क्लब या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. सादरकर्ते श्री. उदय खरे हे स्वतः क्रीडा संघटक असून विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात आजपर्यंत विविध नामवंत खेळाडू, मार्गदर्शक, कोच, जाणकार आणि अभ्यासकांना त्यांनी निमंत्रित केले आहे. समुदायातून विविध खेळाडू तयार व्हावेत व त्या त्या क्रीडा प्रकाराच्या सखोल माहिती बरोबरच मार्गदर्शनही तरुणांना विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमाद्वारे मिळते. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या खेळाडूंनी या कार्यक्रमात त्यांचे विचार प्रकट केले आहेत. विश्वास स्पोर्टस क्लब हा कार्यक्रम दर सोमवारी दुपारी ४:०० वाजता रेडिओ विश्वास 90.8 वर प्रसारीत केला जातो.

5) आजीच्या गोष्टी

ajichya-gosti आजीच्या गोष्टी हा कार्यक्रम रेडिओ विश्वास 90.8 वर सौ. मंगला कमोद व सौ. अजिता गानू या सादर करतात. लहान मुलांना समोर ठेऊन या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. मागील एका पिढीने जरी आजीच्या गोष्टी ऐकलेल्या असल्या तरी आजकालच्या बच्चेकंपनीला आजीच्या गोष्टी आणि तो काळ अनुभवता येईलच असे नाही. आजीच्या गोष्टी कार्यक्रमाद्वारे लहान मुलांना आवडेल, भावेल अशा भाषेत राजा-राणीच्या, परिकथांच्या तसेच बोधात्मक, देशभक्तीपर गोष्टी सांगितल्या जातात. या कार्यक्रमाद्वारे लहान मुले रेडिओशी जोडले जाऊन रेडिओ सारख्या प्रभावी माध्यमाची त्यांना जाण व्हावी या उद्देशाने आजीच्या गोष्टी कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. आजीच्या गोष्टी हा कार्यक्रम रेडिओ विश्वास 90.8 वर रविवार ते शनिवार रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी प्रसारीत केला जातो. ही वेळ सर्जनशिलतेची वेळ असून झोपण्या अगोदर मुलांनी प्रबोधनात्मक गोष्टी ऐकाव्यात जेणेकरुन झोपतांना त्यांच्या मनात सुंदर विचार कार्यरत राहतील या उद्देशाने कार्यक्रमाची वेळ ठरविण्यात आली आहे. या वेळेला कुटुंबातील सर्व सदस्य घरी उपस्थित असतात त्यामुळे हा कार्यक्रम रेडिओ आजीच्या रुपाने बऱ्याच कुटुंबातील एक सदस्य बनला आहे.

6) बाळू ऑन एअर

baloo-on-air बाळू ऑन एअर हा रेडिओ विश्वास 90.8 वर प्रसारीत होणारा एक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात विविध स्तरातील सामान्य लोकांना, छोटे विक्रेते व व्यावसायिकांना आमंत्रित केले जाते. श्री.राजेश आहेर ‘बाळू’ या काल्पनिक पात्राद्वारे सबंधितांना मिश्किल शैलीत प्रश्न विचारतात त्यायोगे त्या व्यक्तींची वैयक्तिक,आर्थिक आणि व्यावसायिक माहिती मिळते. समाजातील सामान्य लोकांना त्यांचे मन मोकळे करता यावे, व्यवसाय किंवा कुटुंब चालवितांना त्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती व्हावी या उद्देशातून बाळू ऑन एअर या कार्यक्रमाची निर्मीती झाली. आतापर्यंत भाजीवाली, शेतकरी, मासेवाला, गॅरेजवाला, गोंधळी इ. विविध स्तरातील व्यावसायिकांना व कलाकारांना या कार्यक्रमाद्वारे संधी मिळाली.

7) वैज्ञानिक कुतूहल

vaidnyanik-kutahal आजकाल आपण बघतोच की विज्ञानाने थक्क करणारी प्रगती केली आहे. मानवी जीवन त्यामुळे सुसह्य होण्याबरोबर उन्नतही झाले आहे. अमुक एक गोष्ट अशीच का होते तशीच का वागते. त्या मागचे वैज्ञानिक सत्य जाणून घेण्याच्या उद्देशाने वैज्ञानिक कुतूहल या कार्यक्रमाची निर्मिती रेडिओ विश्वासवर करण्यात आली. सौं. मंगला कमोद हा कार्यक्रम अतिशय अभ्यासपूर्ण रितीने आणि तन्मयतेने सादर करतात त्यामुळे हा कार्यक्रम लहानांबरोबरच मोठ्यांनीही ऐकावा असा झाला आहे. लहान मुलांनाही विज्ञानाची गोडी लागावी व वैज्ञानिक घटनेमागचा कार्यकारण भाव लक्षात यावा यासाठी हा कार्यक्रम खरोखरच रेडिओ विश्वासवरील एक चांगली उपलब्धी बनून राहीला आहे. रेडिओ विश्वासवर दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार रोजी रात्री 8.00 वा वैज्ञानिक कुतूहल हा कार्यक्रमसादर केला जातो.

8) मेरे जीवन का गीत

समाजामध्ये अनेक प्रकारच्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती जसे की कलाकार, कर्मचारी, तंत्रज्ञ, दुकानदार, लेखक, कवी आढळतात अनेकजण विविध ठिकाणी, विविध क्षेत्रात कार्यरत असले तरी आपण सर्वजण भारतीय संगीत संस्कृतीशी कळत नकळत जोडले गेलो आहोत. बालपणापासूनच आपल्या मनात गीतांविषयी मग ती गीते लोकगीत असो किंवा चित्रपट गीते, भावगीते, अभंग इ. प्रत्येकाच्या मनातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि व्यासपीठावर व्यक्त होण्याचा, आत्मविश्वास निर्माण करण्याच्या हेतूने एक व्यासपीठ म्हणून मेरे जीवन का गीत या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. या कार्यक्रमातून संभाव्य कलाकार ही निर्माण होऊ शकतात हाही एक उद्देश या कार्यक्रमामागे आहे. निवडक आवडती दहा गीते घेऊन हा कार्यक्रमसादर केला जातो. आजपर्यंत अनेकजणांनी या कार्यक्रमानिमित्त स्टुडीओस भेट दिली असून मिळालेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

9) नाशिक रॉक्स

समुदायासाठी रेडिओ विश्वासवर अनेक कार्यक्रमसादर होत असले तरी खास तरुणांसाठी एखादा कार्यक्रम असावा अशी संकल्पना समोर आली. या उद्देशातून नाशिक रॉक्स या कार्यक्रमाची निर्मिती झाली. रेडिओ विश्वास 90.8 वर चार वर्षापासून कु. सोहम शहाणे नाशिक रॉक्स हा शो सादर करतो. या कार्यक्रमात तरुणांशी निगडीत जवळपास सर्वच मुद्दे हाताळले जातात. उदा. टेक्नॉलाजी, शहरातील घडामोडी, स्पोर्टस, इ. तरुण वर्गामध्ये हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय असून या कार्यक्रमाचा चाहतावर्गही मोठा आहे. याचबरोबर रेडिओ विश्वासवरील हा सर्वात जुना कार्यक्रम असून आजपर्यंत कार्यक्रमाचे हजारो एपिसोड झाले आहेत.

10) लेडीज कट्टा

ledis-katta लेडीज कट्टा महिलांचे भावविश्‍व जाणून घेण्याच्या उद्देशातून या कार्यक्रमाचीनिर्मिती करण्यात आली आहे. महिला मग त्या घर सांभाळणार्‍या असोत किंवा ऑफिसमध्ये जाणार्‍या असोत महिलांशी निगडीत प्रश्नांची उकल होण्याच्या दृष्टिकोनातून लेडीज कट्टा या कार्यक्रमाचे प्रयोजन करण्यात आले आहे. लेडीज कट्टा या कार्यक्रमात अनेक प्रकारचे वैविधतेने नटलेले विषय घेतलेले जातात. जेणेकरुन समाजप्रबोधन करण्याकडे कल असतो. या कार्यक्रमामध्ये काही वेळेस लहान मुलांना आमंत्रित करण्यात येते. तर कधी व्यक्तीविशेष म्हणून कोणत्याही क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना मग ती स्त्री किंवा पुरुष असो यांना आमंत्रित केले जाते व त्यांना बोलण्यासाठी रेडिओ एक व्यासपीठ तयार करुन देते. हा कार्यक्रम स्नेहल सारंग आणि अर्चना काळे सादर करतात.

11) आमची संस्था

amachi-santha शहरीकरणाची एकीकडे झपाट्याने वाढ होत असतांना दुसरीकडे काही नवीन प्रश्न नवीन समस्या उदभवत आहेत. परंतू दुर्देवाने अशा प्रश्नांकडे गांभीर्याने बघितले जात नाही. त्यामुळे असे प्रश्न त्याच स्थितीत राहतात परंतू अशा मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने काही बिगर सरकारी सामाजिक संस्था आल्या आजूबाजूला कार्यरत असतात. विशिष्ट प्रश्न समोर ठेवून त्यांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांचे कामकाज चालू असते. आणि बऱ्यापैकी त्यात यशही मिळतांना दिसते मग ते प्रश्न अनाथ मुलांचे असो, सोशीत-पिडीत महिलांचे असो किंवा आबाल वृद्धांचे असो. अशाच संस्थाचा परिचय समाजासमोर यावा व त्यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांना व्हावी जेणेकरून समाजातील नागरीकांनाही अशा संस्थाची मदत मिळू शकते हाच उद्देश समोर ठेवून रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओने ‘आमची संस्था’ हा संस्था परिचयात्मक कार्यक्रम तयार केला आहे. नाशिक मध्ये कार्यरत असलेल्या संस्थाचे कार्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनमानसांसमोर येणार आहे.

12) भारत भ्रमंती

भारत देश हा विविध परंपरा, संस्कृती, विविध भाषा, वेशभूषा, चालीरितींनी नटलेला देश आहे. अशा विविधरंगी, विविधढंगी भारताला समजून घ्यायचे असेल तर पर्यटनाला पर्याय नाही. परंतू बऱ्याचदा काही वैयक्तीक समस्या अडचणींमुळे प्रत्येकालाच पर्यटन शक्य होत नाही किंवा ज्यांना शक्य होते त्या सर्वांना निवासाची, खानपानाची, सुविधांची माहिती अशा समुदायापर्यंत पहोचण्याच्या उद्देशाने ‘भारत भ्रमंती’ या कार्यक्रमाची संकल्पना तयार झाली. या कार्यक्रमातून भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे व तेथील कला व संस्कृतीचा परिचय श्रोत्यांना करुन दिला जातो. पर्यटनाचा दिर्घ अनुभव असलेले श्री शेखर चंदने हे हा कार्यक्रम रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओवर सादर करतात.

13) तयारी स्पर्धा परिक्षांची

tayari-spardha-parikshechi सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे आपल्या आजूबाजूला विविध प्रकारचे पारंपारिक शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था अस्तित्वात आहेत. महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार पुरस्कृत विविध स्पर्धा परिक्षांचे आयोजन केले जाते. याच स्पर्धा परिक्षांद्वारे राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर विविध प्रकारच्या सेवा बजावता येतात परंतू योग्य मार्गदर्शना अभावी बरेचसे विद्यार्थी चाकोरीबद्ध अभ्यासक्रमात अडकून पडतात. त्यांना इतर क्षेत्रांची ओळख होत नाही. विविध स्पर्धा परिक्षांची ओळख व्हावी या हेतूने 22 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले श्री. संजय यशवंत अपरांती यांचा ‘तयारी स्पर्धा परिक्षांची’ हा स्पर्धा परिक्षांची माहिती व मार्गदर्शनपर कार्यक्रम रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर सुरु आहे.

14) माझी कविता

mazhi-kavita आजकाल अनेकजण विविध माध्यमांचा उपयोग करुन अनेक सामाजिक विषय हाताळत असतात. कविता हे असेच एक माध्यम आहे ज्यामध्ये आपल्या अमूर्त विचारांना एकत्रितरित्या रचनात्मक मांडणी करुन शब्दबद्ध केले जाते. कवितांद्वारे प्रत्येकाची जगाकडे बघण्याची एक वैयक्तिक दृष्टी तयार होत असते. प्रत्येक जण त्याला भेडसावणाऱ्या समस्या, अनुभव किंवा घटनांना कवितेतून मांडत असतो. प्रत्येकालाच कविता संग्रह काढणे काही कारणांमुळे शक्य नसते अशा नव कविंसाठी एक व्यासपीठ तयार व्हावे म्हणून रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओवर ‘माझी कविता’ हा कार्यक्रम सुरु आहे. श्री. प्रशांत पाटील या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करित आहे.

15) मैत्र कट्टा

radio-maitre-karva आज विज्ञानाने कितीही आधुनिक प्रगती केली असली तरी आपल्या आजूबाजूच्या तरुणांची मानसिकता एका विचित्र परिस्थितीत सापडली आहे. नकारात्मकता वाढीस लागलेली दिसत आहे. आपल्यातल्या उर्जेचा कशा पद्धतीने उपयोग करावा या बाबतीत आजचा तरुण गोंधळलेला आहे. तरुणांच्या याच मनस्थितीचा फायदा समाजातील असामाजिक घटक घेतांना दिसतात. तरुणांच्या उर्जेला एक चांगली दिशा मिळावी व त्यांनी हिंसाचारापासून प्रवृत्त व्हावे या उद्देशाने रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ ‘मैत्र कट्टा’ मित्रांनी मित्रांसाठी तयार केलेला चर्चात्मक कार्यक्रमसुरु आहे.

16) तनिष्कांच्या भावविश्वात

tanishka-group आज महिलांवरील अत्याचाराच्या घटना अनेक वर्तमानपत्रातून टि.व्ही चॅनेल्सच्या माध्यमातून आपण वाचत किंवा बघत असतो. अशाच शोषित आणि पिडीत महिलांवर भाष्य करणारा ‘मुझे पंख दे दो’ आणि ‘लेडिज कट्टा’ हा महिलांच्या विषयाला वाहिलेला कार्यक्रम रेडिओ विश्वास 90.8 वर सध्या सुरु आहे. या कार्यक्रमांच्या बरोबरीने महिला सक्षमीकरणावर आणि त्यांना भावना व्यक्त करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ म्हणून तनिष्का गृप, सकाळ माध्यम समुह आणि रेडिओ विश्वास 90.8 यांच्या संयुक्त उपक्रमातून ‘तनिष्कांच्या भावविश्वात’ हा कार्यक्रम रेडिओ विश्वास 90.8 वर सुरु आहे. एक तासाच्या या कार्यक्रमात आवडीची गाणीही ऐकवली जातात. महिलांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजनही रेडिओ विश्वास तर्फे करण्यात येत आहे.

17) जाणिव सामाजिकतेची

janiv-samajiktechi ‘जाणीव सामाजिकतेची’ या सामुदायिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हा विषयक मुख्यता केंद्रीत केला आहे. तसेच महानगरपालिका व खासगी शिक्षण संस्थातर्फे चालविण्यात येणार्‍या प्राथमिक शाळा या कार्यक्रमात केंद्रीभूत ठेवून सदर कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा म्हणून रेडिओ विश्वास प्रयत्न करित आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजांसोबतच शिक्षण ही देखील अतिमहत्त्वाची गरज आहे. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा मानला जातो. म्हणूनच वंचित, दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राथमिक शिक्षण मिळाले तर त्यांचा शिक्षणासंर्भातील दृष्टीकोन व्यापक होण्यास मदत होते व शिक्षणाविषयी ओढ निर्माण होऊन त्यांचे भवितव्य उज्वल घडू शकते. यासाठी या विषयावर संवेदनशीलतेने काम करण्याची गरज लक्षात घेऊन रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओद्वारे या ‘जाणीव सामाजिकतेची’ या उपक्रमाच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आलेला आहे. आजपर्यंत या कार्यक‘मात अनेक शाळांनी सहभाग नोंदविला आहे. या कार्यक‘मातून अनेक विद्यार्थांचे कलागुण आणि विविध पैलू समोर येण्यास मदत झाली. या शिवाय त्यांच्या आत्मविश्वासातही वाढ झाली. मुलांनीच सांगितलेल्या कथा, कविता, किंवा सुविचार इत्यादी गोष्टींना या कार्यक्रमात स्थान देण्यात आले. समाजातील वंचित, दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना याद्वारे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. शालेय मुला-मुलींच्या मुक्त अभिव्यक्तिला चालना देण्यासाठी ‘जाणीव सामाजिकतेची’ हा रेडिओ कार्यक्रम उपयुक्त ठरला आहे. साधारण शाळेतील मुलांसोबतच अंध, विकलांग, रस्त्यावरची मुले अशा विविध घटकांतील विद्यार्थी, मुले-मुली या कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवत आहेत. त्यामुळे रेडिओ विश्वास 90.8 सामुदाय रेडिओ त्यांच्या पसंतीस खरा ठरला आहे.

18) नातवंडांशी गप्पा

natvandanshi-gappa-tappa लहान मुलांचे भावविश्व त्यांच्यावर ज्या प्रकारे संस्कार होतात त्याप्रमाणे घडते. बालमनास निकोप आणि संस्कारांनी प्रेरित असे घडवायचे असेल तर त्यांच्या समोर चांगले विचार आणि ऊच्च आदर्श ठेवावे लागतात. परंतू आजच्या स्पर्धेच्या युगात घरच्यांना तेवढा वेळ मिळणे कठिणच नाही तर दुरापास्त झाले आहे. हिच उणीव भरून काढण्यासाठी ‘रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ’ वर ‘नातवंडांशी गप्पा’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आहे. बालगोपाळांना जमवून त्यांना विविध गोष्टी, गप्पा, अनुभव व रोजच्या जीवनातील घडामोडी रंजक पद्धतीने सांगुन शिकवावं व त्यांच्या मनात उद्भवणाऱ्या अनेक प्रश्नांना सर्जनशील वाट करून द्यावी, ज्याद्वारे त्यांचा आत्मविश्वास वाढेल व त्यांची जिज्ञासू वृत्ती जोपासली जाईल ही मूळ संकल्पना या कार्यक्रम निर्मितीमागे आहे. तसेच लहान मुलांच्या मनात येणार्‍या विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्याच सभोवताली घडणार्‍या अनेक घटनांचे दृष्टांत देऊन त्यांना परिसराविषयी अधिक अभ्यासू करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात केला जाणार आहे. तसेच त्यांच्या जिव्हाळ्याच्या, आत्मियतेच्या, सृजनशिलतेला वाव देणार्‍या, मनातील भिती दूर करणार्‍या व त्यांना स्वतःची ओळख करून देणार्‍या विविध विषय व मुद्यांवर त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा या कार्यक्रमात केल्या जातील. ‘नातवंडांशी गप्पा’ या रेडिओ कार्यक्रमाला विषयांची कोणतीही चौकट नसून मुलांना चांगले वळण लागावे यासाठी हा कार्यक्रममुलांसाठी खुला मंच म्हणून कार्यरत राहाणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून समूदायातील सक्रीय बालगोपाळांची एक कार्यक्रम समिती तयार करून त्यांचे नियोजन कौशल्य वाढवून त्यांचे संपूर्ण सहभागातून सदर कार्यक्रमाचे संचालन करण्याचा अभिनव प्रयोग नातवंडांशी गप्पा या कार्यक‘माच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न रेडिओ विश्वास करित आहे.

19) पुस्तकाच्या पानातून

pustakachya-panatun पुस्तके आपल्याला जीवनाकडे एक विशिष्ट नजरेने बघण्याचा दृष्टिकोन देतात. ज्ञान, मनोरंजन, साहित्य, विज्ञान, कला, संगीत, कथा, कादंब-या सर्व साहित्य प्रकारांची सफर आपल्याला पुस्तके घडवून आणतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच पुस्तके वाचण्यासाठी वेळ देता येत नाही. अशा वेळेस पुस्तक वाचनाची अनुभुती श्रोत्यांना मिळावी या हेतूने पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. नामवंत लेखकांची पुस्तकांचे वाचन पुस्तकाच्या पानातून या कार्यक‘मात करण्यात येते. आजपर्यंत अनेक नामवंत लेखकांच्या पुस्तकांचे वाचन पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

20) स्वच्छतादूत

rag-picker एकीकडे शहरीकरणाची झपाट्याने वाढ होतांना दिसते आहे आणि दुसरीकडे त्याच वेगाने कचर्‍याची समस्या आणि कचर्‍याची विल्हेवाट यावर अजूनही म्हणावा तसा उपाय सापडलेला नाही. कचरा ही गोष्ट शहराच्या सौंदर्यास बाधा आणते. कचर्‍याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. कचर्‍याविषयी जागरुकता हळू हळू वाढतांना दिसत आहे. काही सामाजिक संस्था, कार्यकर्ते या कामी कार्यरत असतांना दिसतात. अशा संस्थांचे, कार्यकर्त्यांचे कार्य जनसामांन्यासमोर यावे याच हेतूने रेडिओ विश्वास 90.8 वर ‘स्वच्छतादूत’ या कार्यक्रमाची संकल्पना मांडली गेली. सेवा संस्थेच्या सहाय्याने कचरा वेचक महिलांनी कृषीथॉन या भव्य प्रदर्शनात कंपोस्ट खत निर्मिती व कमी वजनाच्या कुंड्या कशा बनवाव्यात याचे उदाहरणासकट प्रात्यक्षिक त्यांनी उपस्थितां समोर केले. कम्युनिटी रेडिओचे जनक श्रीधरन राममूर्ती यांच्या हस्ते रेडिओ संचाचे वाटप त्यांनी प्रत्येक वस्तीतल्या महिलांना केले. भिमवाडीतील काही महिलांनी महिलांच्या कथा व्यथा व प्रश्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून समोर आले. भिमवाडीतील काही महिलांना प्रशिक्षित करण्याचे काम सेवा संस्थेद्वारे सुरु आहे जेणेकरून त्यांचा आर्थिक विकास होईल. कचरा वेचक महिलांचे प्रश्न आणि त्यांना भेडसावणार्‍या समस्यांवर ‘स्वच्छतादूत’ कार्यक्रमात भाष्य करण्यात येते. या कार्यक्रमामुळे कचरा वेचक महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलेल आणि अशा महिलांचा आत्मविश्वासात वाढ होण्यास मदत होईल हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

21) शहरी परसबाग

sahari-parsbaag दिवसेंदिवस झपाटयाने होत असलेले शहरीकरण, वाढती लोकसंख्या यामुळे वाढणारी जागेची निकड या गोष्टींमुळे बागकामाचा छंद जोपासणे अवघड होत आहे. आवड असूनही जागेच्या उपलब्धते अभावी बागकामाचा छंद सामान्य माणसाला जोपासता येत नाही. हिच समस्या लक्षात घेउन गच्चीवरची बाग या विषयाचे अभ्यासक श्री संदिप चव्हाण यांनी अपार्टमेंटमधील गच्चीचाही वापर परसबागेसाठी होउ शकतो हे सहज सोप्या पद्धतीने रेडिओ विश्वास 90.8 वरिल शहरी परसबाग या कार्यक्रमातून दाखवून दिले. योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास कंपोस्ट खत व पाण्याचे नियोजन करुन शेतातील फळभाज्या आणि पालेभाज्या आपण आपल्या उपलब्ध गच्चीतील जागेतही पिकवू शकतो यासंबधी सखोल मार्गदर्शन शहरी परसबाग या कार्यक्रमातून केले जाते. ज्या श्रोत्यांना काही प्रश्न असल्यास त्याचे निराकरणही या कार्यक्रमामार्फत केले जाते. बाजारात मिळणा-या फवारणीयुक्त फळभाज्या व पालेभाज्या टाळून सेंद्रीय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला आपल्याला घरच्याघरी उपलब्ध होऊ शकतो याची खात्री या कार्यक्रमातून श्रोत्यांना मिळत आहे.

22) कायद्याच्या चौकटीतून

kaydyachya-chawkatitun भारत स्वतंत्र झाल्यापासून भारतीय जनतेच्या हितासाठी अनेक कायदे करण्यात आले. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी व कुणावरही अन्याय होउ नये याच उद्देशाने कायदे निर्माण झाले. जसा जसा काळ बदलत गेला तसे कायद्यांचे स्वरुपही बदलत गेले. काही नविन बाबींचा अंतर्भाव अधिपासून अस्तित्वात असलेल्या कायद्यात करण्यात आला व वेळप्रसंगी नविन कायदेही निर्माण करण्यात आले. तरिही सामान्य जनतेच्या मनात कायद्याविषयी अनभिज्ञता व अज्ञान असते. आपल्या प्रश्नांची सोडवणूक करावयाची असल्यास योग्य त्या कायद्याचा आधार घ्यावा लागतो. परंतू कायदेविषयक अज्ञानामुळे सामान्य माणूस त्या पासून दुर राहतो. श्रोत्यांच्या मनात असलेले कायदेविषयक गैरसमज दुर करण्याकरिता व विविध कायदेविषयक माहिती त्यांना मिळावी या उद्येशाने कायद्याच्या चौकटीतून विविध कायदे विधिज्ञांची मुलाखत, श्री राजेश हिवरे यांचेद्वारे घेतली जाते. आजपर्यंत या कार्यक्रमात अनेक नामवंत विधिज्ञांनी कायदेविषयक मार्गदर्शन श्रोत्यांना केले आहे. कायद्याच्या चौकटीतून या कार्यक्रमात आजवर विविध विषयांवर चर्चा घडविण्यात आली आहे. जसे.. निगोशिएबल इर्न्स्टुंमेंट अॅक्ट, 1881 हिंदू मॅरेज अॅक्ट, 1955, स्पेशल मॅरेज अॅक्ट, 1954 जन्म, मृत्यू, विवाह अॅक्ट, 1986

23) लढाई कॅन्सरशी

aragam-dhan-sampada आदी मानवापासून ते आधुनिक मानवापर्यंत अनेक स्थित्यंतरे आजपर्यंत घडून आली. पूर्वीच्यातुलनेत आजकाल बघावयास मिळणारी तीव्र मानसिक स्पर्धा व या स्पर्धेमुळे येणारा ताणतणाव याचा परिणाम मानवी आरोग्यावर झाला नाही तरच नवल! अशा अनावश्यक स्पर्धा व ताणतणावामुळे आधुनिक मानसाची जीवनशैली पूर्णतः बदलून गेली आहे. अवेळी आहार, अवेळी निद्रा याचा विपरित परिणाम मानवी आरोग्यावर होतांना दिसत आहे. याच कारणांमुळे कॅन्सर सारख्या आजाराचे रुग्ण वाढत आहे. तरुणांमधील व्यसनाधिनता उदा. सिगारेट, तंबाखु, गुटखा याशिवाय झटपट मिळणारे फास्ट फुड याचाही भर पडतांना दिसत आहे. सध्याच्या आकडेवारी नुसार 30 ते 35 वर्ष वयोगटातील व्यक्तींना कॅन्सरचा सर्वात जास्त धोका आहे. 10 ते 12% स्त्री-पुरुषांना फुप्फुस संबंधी आजार झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे फुप्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता 2% नी वाढली आहे. 15% ते 17% व्यक्ती अतिरिक्त मद्यपानामुळे लिव्हर आणि किडनी संबंधीत कॅन्सरच्या शक्यतेमुळे धोक्याच्या पातळीवर आहेत. कॅन्सरविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या हेतुने ‘लढाई कॅन्सरशी’ या कार्यक्रमाची संकल्पना ऑक्टोबर 2016 पासून रेडिओ विश्वास 90.8 वर मांडण्यात आली. प्रख्यात कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ.श्रीकांत खरे हे लढाई कॅन्सरशी हा कार्यक्रम सादर करतात. भविष्यात या कार्यक्रमात रुग्णांचाही समावेश करण्याचे ठरले आहे. कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी व ताणतणाव रहीत जीवन शैली अंगीकारावी हा हेतू आहे. लढाई कॅन्सरशी या कार्यक‘मात अंतर्भूत करण्यात आलेले विषय 1) कॅन्सरची व्याख्या माहिती व प्रकार 2) बेस्ट कॅन्सर 3) हेड अॅण्ड नेक (माऊथ कॅन्सर) 4) आहार नलिका कॅन्सर इत्यादी कॅन्सर विषयी जागरुकता लढाई कॅन्सरशी या कार्यक्रमातून केली जाते.

24 कंट्रोल रुम

control-room आजचा समाज वेगाने आधुनिक युगाकडे प्रवास करत आहे. परंतू बदललेल्या जीवनशैलीने याच समाजात काही गुन्हेगारी विषयक मुलभूत प्रश्न निर्माण केले आहेत. आधुनिक समाजाबरोबरच गुन्हेगारही आधुनिक होत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत गुन्हे घडवितांना दिसत आहेत. यामुळे पोलिसांपुढे एक नवीन आव्हान तयार झाले आहे. अशा गुन्हेगारांना हुडकून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. शहरात घडणार्‍या चेन स्नॅचींग, बालगुन्हेगारी, घरगुती हिंसाचार, घरफोड्या, किरकोळ कारणांमुळे होणारे खुन, सायबर क्राईम , खंडणी इत्यादी घटना घडल्यानंतर किंवा घडण्यापूर्वी पोलिस प्रशासनाला नेहमीच सतर्क असावे लागते. पोलिसां विषयी एक प्रकारची नकारात्मक मानसिकता जनसामांन्यामध्ये असते. ती प्रतिमा पुसण्यासाठी व पोलिस प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी कशा प्रकारे कार्यरत असते व पोलिसांची सकारात्मक बाजू जनतेसमोर यावी या हेतूने ‘कंन्ट्रोल रुम’ या कार्यक्रमाची रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओवर निर्मिती करण्यात आली आहे.

25 काय वाटतं बोला! लाईव्ह शो

दुरध्वनीद्वारे श्रोत्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून विविध विषयांवर त्यांची मते जाणून घेता यावी. या उद्येशाने काय वाटतं बोला! या फोन इन कार्यक्रमाचीसंकल्पना पुढे आली. या कार्यक्रमा मार्फत श्रोते थेट कार्यक्रमात सहभागी होउन सामाजिक किंवा दैनंदिन गोष्टिंवर त्यांचे मत व्यक्त करतात. आजपर्यंत या कार्यक्रमात- तुम्ही तुमच्या मतदानाच्या हक्काविषयी जागरुक आहात का?, वृक्षांचे महत्व आणि आपली जबाबदारी, ऑनलाईन फसवणूक, लोडशेडिंग, डेज सिले करावेत का नाही? घटस्फोटाचे वाढते प्रमाण, इस्त्रोची भरारी, नैराश्य अर्थात डिप्रेशन, आजचा चित्रपट वास्तवापासून दूर जातोय का? चैनस्नेचिंगचे वाढते प्रमाण हया विषयांवर श्रोत्यांनी त्यांची मते प्रदर्शित केली. दर शुक्रवारी सकाळी 10.00 वा. हा कार्यक्रमलाईव्ह प्रसारित केला जातो.

प्रशिक्षण उपक्रम

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रेडिओ जॉकी’ आणि ‘साऊन्ड एडीटींग’ कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळेत रेडिओ जॉकी संकल्पना, निवेदन, व्हाईस मॉड्यूलेशन, साऊंड एडीटींग सॉफ्टवेअरची माहिती देण्याबरोबरच प्रत्यक्ष सराव करवून घेण्यात येतो. प्रशिक्षणात विद्यार्थी, संस्था, संघटनेचे कार्यकर्ते, नोकरदार, शिक्षक, पालक व गृहीणी अशा विविध समुदायातील व्यक्तींना सहभाग नोंदविला जातो. उपयुक्त तंत्रशिक्षीत अनुभवी रेडिओकर्मी तयार करणे व जनसामान्यांना या क्षेत्रात स्थान मिळवून देणे हा या प्रशिक्षण कार्यशाळेच्या आयोजनामागील मुख्य हेतू आहे.

फोटो गॅलरी

संपर्क रेडिओ विश्वास ९०.८ कार्यालय

location-icon
रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ
विश्‍वज्योती, गोविंद नगर (हॉटेल प्रकाश मागे) विश्‍वास बँकेच्या मागे, मुंबई नाका, नाशिक-422 009.
phone-icon
(०२५३) २४७२६२६, २४७२६२७
whatsapp-icon
८३७८०८३७८०
facebook-icon
https://www.facebook.com/radiovishwas90.8
twitter-icon
https://twitter.com/@radiovishwas908
email-icon
info@vishwasdynanprabodhini.com

आम्हाला अनुसरण करा

संपर्क कार्यालय

location-icon
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक
निरज हाईट्स, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३ (महाराष्ट्र)
fax-icon
०२५३ - २३०५६०५
time-icon
info@vishwasdynanprabodhini.com