संपर्क कार्यालय

निरज हाईट्स, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३ (महाराष्ट्र)


विश्वास ज्ञान प्रबोधिनीने विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारली असून अभ्यासासाठी शांत व पोषक वातावरण आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे. स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना आवश्यक ग्रंथ, नियतकलिके उपलब्ध करुन देत आहोत त्याच बरोबर इंटरनेट द्वारा माहिती व संदर्भसेवेबरोबरच झेरॉक्स सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
आजच्या व्यावसायिक शिक्षण पद्धतीमध्ये उत्तम दर्जाचे प्राथमिक शिक्षण सुद्धा दुरापास्त होत चाललेले आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या मागास घटक शिक्षणापासून वंचित होत आहे. त्यातच लहान घरात शांतपणे अभ्यास करण्याची सोय नसल्याने अशा कुटुंबातील विद्यार्थी मागे राहात आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिद्दीने शिक्षण घेत असलेल्या खास मागास व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका संस्था चालवित आहे. विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांद्वांरे यश संपादन करून, इतर व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून समाजातील मुख्य धारेत आपले भक्कम स्थान निर्माण करावे हा अभ्यासिकेमागील संस्थेचा उद्देश आहे. 31 मार्च 2015 अखेर नियमित अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांची संख्या 143 आहे.
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने श्रीमती सुधा मेहता व त्यांचे सहकारी यांनी चालविलेला “दिशा शैक्षणिक उपक्रम” हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. श्रमिक, कष्टकरी व मजूर कुटुंबातील, विशेषत: आनंदवल्ली व परिसरातील निम्न मध्यमवर्गीय व आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या वंचित घटकातील मुले-मुली यांच्यामध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण व्हावी, त्यांनी त्यांचे औपचारिक शालेय शिक्षण पूर्ण करून पुढील उच्च शिक्षणासाठी प्रेरित व्हावे या उद्देशाने सदर उपक्रम अविरतपणे सुरू आहे.
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक आणि विश्वास को-ऑप. बँक लि. यांच्या तर्फे सदर उपक्रम सफल होण्यासाठी विविध स्तरावर मदत केली जाते. विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विश्वास ठाकूर स्वत: दिशा शैक्षणिक उपक्रमात सातत्याने सहभागी होऊन मार्गदर्शन करत असतात. इयत्ता 1 ली ते 10 वी चे वर्ग या उपक्रमाअंतर्गत चालविले जातात. हे वर्ग चालविणेकरिता सामाजिक कामाची आवड असणारी अनुभवी शिक्षक मंडळी म्हणून कल्पना ओहोळ, संगीता कुलकर्णी, दीप्ती, प्रीती, रेखा, कोमल, स्नेहल कुलकर्णी व सुधा मेहता, आदी परिश्रम घेतात. आतापर्यंत 500 च्या वर विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी सदर उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे. याच उपक्रमात शिकलेल्या रेखा व कोमल या विद्यार्थिंनी आता शिकविण्याचे काम करतात ही दिशा शैक्षणिक उपक्रमाचे फलित आहे. तसेच या उपक्रमाचे लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठ्या उत्साहाने प्रयत्नशील आहेत, तर काही विद्यार्थी नोकरी मिळविण्यात यशस्वी ठरलेले आहेत.
याच प्रकारचे उपक्रम नाशिकमधील विविध भागांमध्ये सुरू व्हावे अशी अपेक्षा आहे. जेणे करून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी गोडी निर्माण होईल व खाजगी क्लासेसची फी न भरू शकणार्या अशा गुणवंत विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण प्राप्त होईल. हा नाविन्यपूर्ण उपक्रम चालविणे ही मात्र दिशा शैक्षणिक उपक्रम किंवा विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट यांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातून एक छोटासा वाटा आम्ही उचललेला आहे. या निर्मळ भावनेतून मागील आठ वर्षापासून हे प्रयत्न अविरतपणे सुरू आहेत. सदर उपक्रमाची माहिती देणारा “जमिनीवरचे तारे” हा माहितीपट तयार करण्यात आला आहे.