संपर्क कार्यालय

निरज हाईट्स, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३ (महाराष्ट्र)


नाशिक झपाट्याने बदलत आहे. मागील 10-12 वर्षांचा काळ अभ्यासला तर हे हमखास लक्षात येते की, नाशिकचा हा बदल अत्यंत जलद गतीने होत आहे. मूलभूत सोयीसुविधा ते माहिती तंत्रज्ञानापर्यंतचा हा बदल याची देही याची डोळा आपण बघत व अनुभवत आहोत. आज नाशिकचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या नकाशावर विकसित होणार्या शहरांसोबत जोडले जात आहे. तेव्हा पुढील पन्नास वर्षांत नाशिकचा चेहरा-मोहरा बदललेला असेल यात कुठलीही शंका नाही. परंतु नाशिकचा हा जलदगती होणारा बदल शाश्वत व पर्यावरणपूरक असावा यात कुणाचेही दुमत नसावे. नेमका हाच मुद्दा लक्षात घेऊन विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक व विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने भविष्यातील नाशिक 2050 हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा उद्देश नाशिकच्या विकासाची विस्तृत रुपरेषा तयार करणे व नाशिकच्या विकासात हातभार लावू इच्छिणार्या प्रत्येक घटकास ती उपलब्ध करून देणे हा आहे. सदर रुपरेषा तयार करताना यामध्ये नाशिकमधील जुन्या अनुभवसंपन्न व आधुनिक विचारसरणीने जगाकडे बघणार्या युवा पिढीचा सहभाग असावा असे आम्हाला मनापासून वाटते. यासाठी सदर उपक्रमामध्ये सहभागासाठी आम्ही नाशिकमधील सर्व स्तरातील व्यावसायिक, निवृत्त व सध्या सेवेत असणार्या अधिकारी, कर्मचारी, वास्तुविशारद, विद्यार्थी, विविध विषयांवर काय करणार्या स्वयंसेवी संस्था यासह नाशिकच्या विकासात हातभार लावू इच्छिणार्या सर्वच मान्यवर व्यक्तींना आमंत्रित करीत आहोत.
नाशिकचा पर्यावरणपूरक विकास ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असे आम्हाला वाटते. तेव्हा ही जबाबदारी आपण सर्वांनी आनंदाने पेलली पाहिजे म्हणूनच हा उपक्रम सर्वांसाठी खुला आहे. आपण या कार्यक्रमामध्ये वेळ देऊन, उपक्रमातील विशिष्ट जबाबदारी स्वीकारून, तुमच्या मनातील संकल्पना मांडून किंवा उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून अशा विविध प्रकारे सहभागी होऊ शकता.