संपर्क कार्यालय
निरज हाईट्स, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३ (महाराष्ट्र)
संशोधन व प्रशिक्षण हा समाज विकासाचा पाया आहे. हा पाया अधिक भक्कम करण्यासाठी प्रगतीच्या दिशेने मूलभूत विषयांवर संशोधन करणे व त्याद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रम चालविणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. संशोधनाचे हे उद्दिष्ट प्रभाविपणे राबविण्यासाठी मानव संसाधन विकास हा संस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्याद्वारे व्यवस्थापन, संवाद, सहकार कौशल्ये व एकंदरीत जीवन कौशल्ये यावर संस्थेचा भर आहे. या संपूर्ण संशोधन व प्रशिक्षणाचा उपयोग व्यक्ती, कार्यरत संस्था तसेच सर्व समाज अशा पद्धतीने विस्तारलेला आहे. यासाठी ज्ञान, कौशल्ये व दृष्टिकोन विकास ही त्रिसूत्री संशोधन व प्रशिक्षणाचा आधारस्तंभ आहे.
बुधवार, दि.17/05/2017 ते शुक्रवार दि.19/05/2017
कॅलिग्राफी सुलेखन कार्यशाळा अबीर क्रिएशनचे निलेश गायधनी, चिंतामण पगारे, पूजा गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. देवनागरी व इंग्रजी भाषेतील अक्षरांविषयी, सुलेखनाविषयी यात मार्गदर्शन करण्यात आले. अक्षरांचे सौंदर्य, लेखनातील सहजता व पद्धती यांविषयी सप्रयोग माहिती कार्यशाळेत देण्यात आली.
अक्षरांना एक रूप असते व भावरूप असते. मनातले भाव कागदावर कलात्मकपणे उतरण्यासाठी अक्षरांचा ध्यास व त्याचा अर्थ यांचा मेळ साधला गेला पाहिजे. अक्षररूप हे मनाची अवस्था प्रकट करत असते. कुठल्याही रेषेतून निर्माण झालेला शब्द हा अर्थ घेऊनच कागदावर येत असतो. त्यासाठी साधना व अक्षरांच्या लयीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अक्षरातून व्यक्तीमत्व प्रकट होत असते. व जाणिवेला नवा आयाम प्राप्त होत असतो. भारतातील नवनवीन लिप्या व त्यांची शैली याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या काळात अक्षरलेखनाला व्यावसायिक महत्व प्राप्त झालेले आहे.
मार्गदर्शक : नितीन देशमुख व अरूण सोनवणे शनिवार, दि. 27/05/2017
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन’ करण्यात आले होते.
यावेळी बोलतांना नितीन देशमुख म्हणाले की, शेर हा सुभाषित झाला पाहिजे. स्टेटमेंट झाला पाहिजे. तेव्हा शेर लोकोत्तर होतो काळ मग अशा शेरांचा आदर करतो. शेर अर्थाच्या उंचीवर संपवणे ही कला असते. वाचनार्याला आणि ऐकणार्याला आनंदाच्या गौरीशंकरांच्या शिखरावर नेता आले पाहिजे. गझल वाचून आणि गाऊन (तरन्नूम) दोन्ही पद्धतीने सादर करता येते. मात्र उगाच ओढून, ताणून, किंचाळून गाण्याने, गझलेचे नुकसान होते. आलापी म्हणजे गायकी नव्हे. गझल ही शब्दप्रधान असल्याने आशय पोहचण्याइतकेच तरन्नूमचे महत्व आहे. गझल वाचूनही तितकीच पोहोचते. मात्र वाचन सुद्धा तितकेच सुंदर असावे. गझलतेला शेर अगदी बोलल्यासारखा साधा आणि थेट असावा. पण साधा याचा अर्थ सपक नसावा. अनुभव बोलण्याला अर्थपूर्णता देतो. म्हणून तुकाराम ज्ञानेश्वरांचे बोलणे आजही बोलले जाते. थांबणे ही अघोरी कला आहे. हे खरेच आहे. थांबणार्याच्या नंतरच्या चालण्याला, बोलण्याला आणि लिहिण्याला चिंतनाची एक सुंदर लय आणि गती गवसते. तंत्र कार्यशाळेत शिकता येईल पण गझलीयत ही जीवनाच्या कार्यशाळेतच सापडली तर सापडते. गझलीयत शिवाय असलेले शेर म्हणजे प्रेताचा शृंगार असतो. गझलीयत म्हणजे निर्विचार आनंदाची अनुभूती देणारा अद्भूत विचार असतो. तो आनंद अनुभवायाचा असतो, त्याचे विश्लेषण होत नाही
मार्गदर्शक : अच्युत पालव (सूलेखनकार) रविवार, दि.2/07/2017
पांढर्या शुभ्र छत्र्या आणि त्यावर ओघळणारे सप्तरंगी रंग आणि पावसावरच्या कवितांच्या, गाण्यांच्या ओळी कार्यशाळेतील प्रत्येकाला नवनिर्मितीचा आनंद देत होत्या. पावसाचे अनेक विभ्रम आपआपल्या छत्रीवर रेखाटत होता. पाऊस आणि मानव यांचं नातं किती विलक्षण आणि आनंददायी असते, याचाच हा अनुभव होता.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, अबीर क्रिएशन्स, अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या अंब्रेला पेंन्टींग कार्यशाळेचे विश्वास क्लब हाऊस येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अच्युत पालव यांनी सप्रयोग मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस 50 हून अधिक रसिकांनी सहभाग नोंदविला.
अच्युत पालव यांनी सांगितले की, प्रत्येकाच्या मनात पावसाचं रूप असतं आणि त्याचा अविष्कार प्रत्येक कलावंत, रसिक कलाकृतीतून देत असतो. आरती प्रभूंच्या ‘येरे घना येरे घना, असो किंवा चिंब पावसानं रान झालं आबादानी’ महानोरांचे शब्द असो त्याला एक सर्जनाचं दृश्य रूप असतं. पावसाळ्यातील पाण्याचा खळखळाट सरींवर सरी असोत. तीच अनुभूती प्रत्येक जण घेत होता. छत्र्यांतून अक्षरातून निथळणारा पाऊस आठवणींचा, विरहाचा, शुभ्रसंकेताचा उद्गार देत होता. पाऊस आपल्यातील सृजनशीलतेलाच आव्हान देत असतो. कार्यशाळेसाठी निलेश गायधनी, केतकी गायधनी व चिंतामण पगारे यांनी सहकार्य केले.
व्याख्याते – अभिलाष खांडेकर (मुख्य संपादक-दैनिक दिव्य मराठी)
मंगळवार, दि.11/03/2014
आजची बदलती सामाजिक मानसिकता, राजकारणाची बदललेली परिभाषा आणि मूल्यांचा र्हास यामुळे सामान्य माणसाचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक झाला आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी दिलेले योगदान, आदर्श विचारांची जोपासना हे संचित आहे. त्याचा स्वीकार आणि अंगीकार आजच्या राज्यकर्त्यांनी करावा, त्यातून समृद्ध महाराष्ट्राचे चित्र पुन्हा नव्याने समोर येईल असे प्रतिपादन दिव्य मराठी या दैनिकाचे संपादक अभिलाष खांडेकर यांनी केले.
महाराष्ट्राचे थोर शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या 101 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अभिलाष खांडेकर यांचे ‘यशवंतराव चव्हाण आणि आजचा महाराष्ट्र’ या विषयावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण विभागीय केंद्र-नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, रेडिओ विश्वास 90.8 व विश्वास को-ऑप बँक लि.नाशिकच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
श्री. खांडेकर यांनी भारतातील विविध राज्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक राजकीय बदलांचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायकदादा पाटील, विश्वस्त डॉ.शोभा बच्छाव तसेच दिव्य मराठीचे संपादक जयप्रकाश पवार, प्राचार्य हरिष आडके, रमेश देशमुख, शरद पुराणिक, सुरेश मेणे, श्रीधर देशपांडे व नाशिककर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ख्यातनाम निवेदक व मुलाखतकार : सुधीर गाडगीळ – दि.26 व 27/04/2013
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण विभागीय केंद्र-नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, रेडिओ विश्वास 90.8 व विश्वास को-ऑप बँक नाशिकच्या संयुक्त विद्यमाने ख्यातनाम निवेदक व मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या ‘सूत्रसंचलन आणि मुलाखत तंत्र’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
आजच्या स्पर्धेच्या युगात सूत्रसंचलन आणि मुलाखत तंत्र या क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले असून टी.व्ही.चॅनेल्स, इव्हेंट, मॅनेजमेंट, कॉर्पोरेट क्षेत्रातही नवनवीन संधी प्राप्त झाल्या आहेत. देहबोली, आवाजातील चढउतार, वाचन, समयसूचकता या सूत्रसंचालकासाठी मूलभूत गोष्टी आहेत. मुलाखत घेताना त्यात अनौपचारिकता असावी. ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याच्या आवडी, त्याचे वाचन, छंद, स्वभाव याविषयी माहिती जाणून घ्यावी. वागण्यात स्वाभाविकता, शब्दात सहजता, चेहर्यावर प्रसन्नता असायला हवी. अशा विविध मुद्यांवर मा. सुधीर गाडगीळ यांनी दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
त्यावेळी त्यांनी सूत्रसंचलनाचे, मुलाखतीचे अनुभव आणि किस्से कथन केले. शिबिरार्थींकडून विशिष्ट विषय देऊन त्यांच्याकडून मुलाखतीचे प्रात्यक्षिक करून घेतले. या कार्यशाळेत साठहून अधिक शिबिरार्थी सहभागी झाले होते.
‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत समुहचर्चेचे आयोजन – बुधवार, दि.11/09/2013
सोशल मिडीयाने जगभरातील जनतेची मानसिकता बदलविण्याचे काम सुरू केले असून या स्वायत्त माध्यमाचा प्रत्येकाने किती वापर करावा, याचा गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. विश्वासार्हता आणि सार्वजनिक संकेतांची जोपासना करणे हिच या माध्यमाची मूलतत्त्वे आहेत, सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे फायदे व तोटे यांची साधकबाधक अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी, या उद्देशाने ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत ‘सोशल मिडीया-दुधारी तलवार’ या विषयावरील समुहचर्चेचे आयोजन क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण विभागीय केंद्र-नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट-मुंबई, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, रेडिओ विश्वास 90.8 व विश्वास को-ऑप बँक लि. नाशिकच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.
या चर्चेत प्रा.अनंत येवलेकर, म.टा.नाशिक आवृत्तीचे प्रमुख सचिन अहिरराव, मराठी वर्ल्ड डॉट कॉमच्या निर्मात्या भाग्यश्री केंगे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ.उमेश नागापूरकर, प्राचार्य डॉ.वैशाली रोकडे, प्रतिष्ठाणचे विश्वास ठाकूर, संजय नागरे यांनी सहभाग घेतला. मोमेन्टम संस्थेच्या समुपदेशक ऊर्जा पाटील यांनी सुत्रसंचालन केले. याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
‘शिक्षणकट्टा’ उपक्रमांतर्गत समुहचर्चेचे आयोजन – गुरुवार, दि.26/09/2013
माहिती व तंत्रज्ञानाचा मूळ गाभा हा शिक्षण असून त्याचा सकारात्मक वापर करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यातील उपयुक्तता जाणून घेणे गरजेचे असून या आधुनिक व विश्व व्यापलेल्या तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी करावा. संगणकाचा वापर करणे ही आजच्या काळाची अपरिहार्यता आहे, त्यासाठी शाळांना संगणक अभ्यासक्रम, अध्यापन याविषयी स्वातंत्र्य दिले जावे, शिक्षण व्यवस्थेत होणारे रचनात्मक बदल विद्यार्थ्यांसाठी किती अभ्यासपूर्ण आहेत आणि ज्ञान मिळविण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या उपजत गुणांशी त्यांचे किती जवळकीचे नाते आहे, याचीही चर्चा व्हावी, या उद्देशाने ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमांतर्गत ‘माहिती व तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर’ या विषयावरील समूहचर्चेचे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय सातपूर, नाशिक येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण विभागीय केंद्र-नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट-मुंबई, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, रेडिओ विश्वास 90.8 व विश्वास को-ऑप बँक लि.नाशिकच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले.
या चर्चेत य.च. म. मुक्त विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक माधव पळशीकर, शिक्षणतज्ज्ञ अरुण ठाकूर, महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार जितेंद्र तरटे, प्रतिष्ठाणचे विश्वास ठाकूर मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.झेड.एस.भंदुरे मुख्याध्यापिका स्मिता गायधनी, निर्मला शेलार सहभागी झाले. याप्रसंगी पालक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत समुहचर्चेचे आयोजन सोमवार, दि.21/10/2013
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मराठी भाषेच्या समृद्धीसाठी करण्याच्या प्रयत्नांना चांगले यश मिळत असून त्यामुळेच भाषेविषयी सजगता निर्माण होण्यास निश्चित मदत होत आहे. भाषेमुळे संस्कृतीचे जतन होत असते आणि इतिहासाकडे बघण्याची दृष्टीही मिळते. हाच विचार मराठी भाषेला व्यापकतेकडे नेण्यासाठी महत्त्वाचा आहे. आपल्या लोकभाषा, बोलीभाषा यांचे दस्तऐवजीकरण करण्याची गरज असून त्यासाठी युवा पिढीने पुढाकार घेण्याची गरज आहे त्यातूनच भाषेचे जतन आणि संवर्धन वेगाने होईल. मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाबाबत चर्चा व्हावी या उद्देशाने ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत ‘कॉम्प्युटर युगातील मराठी भाषा’ या विषयावरील समुहचर्चेचे आयोजन सिलिकॉन व्हॅली, विठ्ठल चरणी, विठ्ठल मंदिरासमोर, कॉलेज रोड, नाशिक येथे करण्यात आले होते.
सदर समुहचर्चेचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण विभागीय केंद्र-नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट-मुंबई, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, सिलिकॉन व्हॅली, रेडिओ विश्वास 90.8 व विश्वास को-ऑप बँक लि.नाशिकच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.या चर्चेत सुनिल खांडबहाले, प्रमोद गायकवाड, उर्जा पाटील, नंदन रहाणे, अनुराग केंगे यांनी सहभाग घेतला यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना वक्त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, योग प्रबोधिनी, रेडिओ विश्वास 90.8, विश्वास को-ऑप बँक नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 8 फेब्रुवारी 2015 रोजी संध्या.5 वाजता ‘आदर्श जीवनशैली योगाद्वारे कशी जोपासू शकतो’ या विषयावर गंगापूर रोड येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात मोफत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. आजची बदलती जीवनशैली व त्यामुळे निर्माण झालेले अनेक शारिरीक व मानसिक प्रश्न या समस्यांचे योगाद्वारे आपण सहज निराकरण करु शकतो. यासाठी योगाचे महत्व व योग करण्याच्या विविध पद्धती समजावून योगोपचार अधिक परिणामकारक होण्यासाठी प्रसिद्ध योग प्रशिक्षक कविता निकम यांनी या शिबिरात मार्गदर्शन केले. त्यांनी सुर्य नमस्कार, योगासने, प्राणायाम, ध्यान धारणा इ. योगप्रकारांवर प्रात्यक्षिकांसह विस्तृत माहिती दिली.
या मोफत मार्गदर्शन शिबिराप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक व विश्वास बँकेचे अध्यक्ष श्री. विश्वास ठाकूर व संस्थेच्या सदस्या सौ. दिपाली मानकर उपस्थित होत्या त्याच बरोबर या शिबिराचा विश्वास बँकेतील कर्मचारी व परिसरातील सुमारे 50 नागरिकांनी लाभ घेतला.
मार्गदर्शक – अच्युत गोडबोले व डॉ. दीपा देशमुख (दि. 24/11/2016)
मार्गदर्शक – अच्युत गोडबोले व डॉ. दीपा देशमुख महाराष्ट्राचे थोर शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या 32 व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, सारस्वत को-ऑप बँक लि., विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8 एफ.एम. यांच्या संयुक्त विद्यमाने ख्यातनाम साहित्यिक अच्युत गोडबोले व लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ.दीपा देशमुख यांचे ‘जग बदलणारे जीनियस’ या विषयावरील व्याख्यान कुर्तकोटी शंकराचार्य संकुल सभागृह, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजीत करण्यात आले.
गॅलिलिओ, न्यूटन, आइन्स्टाइन या सर्व शास्त्रज्ञांमध्ये एक समाज गुण आहे, तो म्हणजे अफाट बुद्धिमत्ता असूनही त्यांचे जगणे विक्षिप्त स्वरूपाचे होते. जग बदलणाऱ्या या शास्त्रज्ञांमध्ये प्रचंड कुतुहल होते. मी कायमच विद्यार्थी आहे, ही भावना त्यांच्यामध्ये शेवटपर्यंत होती. कुतुहल जागृत ठेवून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे असून शिकण्याची जिद्द कायम ठेवल्यास प्रत्येक जण जीनियस होईल, असे प्रतिपादन संगणकतज्ज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी केले. ते पुढे म्हणाले की, मी स्वतःला कायम विद्यार्थी समजतो व त्याच भावनेने लेखन करतो. कुतुहल व माणुसकी विसरू नये. हल्लीचे अनेक शिक्षक विद्यार्थ्यांऐवजी परिक्षार्थी घडवतात. का? या प्रश्नाने संशोधनाला चालना मिळते म्हणून विद्यार्थ्यांनी आपले कुतुहल, जिज्ञासा कायम ठेवली पाहिजे. मार्कांपेक्षा विषयावर प्रेम करावे. लहानपणापासून घरात बुजुर्ग गायकांच्या मैफली झाल्या. साहित्यिक, शास्त्रज्ञांचा सहवास घडला. त्यामुळे गणित, विज्ञानाइतकेच साहित्य, संगीत, चित्रकला यावरही प्रेम जडले. विविध विषयांचे कायम आकर्षण राहिले. आयआयटीच्या ग्रुपमुळे विपुल लेखन केले. गुणवत्तेचा, उत्कृष्टतेचा ध्यास घेतला. मोठे ध्येय बाळगून प्रचंड वाचन केले. ‘जीनियस’ या प्रकल्पातील पुस्तके लिहिताना सहलेखिका दीपा देशमुख यांनी खूप मोलोच सहकार्य केले, असेही श्री.गोडबोले म्हणाले. तसेच मुलांची जिज्ञासा मारू नका, त्यांना प्रश्न विचारू द्या, असा सल्लाही श्री.गोडबोले यांनी शिक्षक आणि पालकांना दिला. केवळ परीक्षेसाठी मुलांनी अभ्यास करू नये, तर सर्व क्षेत्रांतील ज्ञान मिळवावे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी ‘जीनियस’ पुस्तकांच्या सहलेखिका डॉ.दीपा देशमुख म्हणाल्या की, जीनियस पुस्तक प्रकल्प पूर्ण करताना माझे वैयक्तिक आयुष्य बदलून गेले. जगात इतके थोर माणसं होऊन गेली हे कळल्याने मी भारावून गेले. ही माणसे आपल्याला ‘चला उठा कामाला लागा’ असा संदेश देतात. जग गाजवणारे शास्त्रज्ञ, संशोधक हळवे असू शकतात. कारण ते अत्यंत संवेदनशील माणूस असतात. येत्या दोन महिन्यात आमचे पश्चिमात्य संगीतावरील ‘सिंफनी’ हे पुस्तक दोन भागांमध्ये प्रकाशित होईल. जग बदललेले जीनियस ही पुस्तक मालिका तसेच तंत्रज्ञानावर आधारीत 12 पुस्तकांची शृंखला प्रकाशित होईल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. अच्युत गोडबोले यांचा परिचय सचिव डॉ. मनोज शिंपी यांनी करून दिला तर सन्मान सदस्य कविता कर्डक यांनी केला. दीपा देशमुख यांचा परिचय कोषाध्यक्ष विनायक रानडे यांनी केला तर सन्मान सदस्य अॅड. नितीन ठाकरे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्य डॉ.सुधीर संकलेचा यांनी केले. कार्यक्रमास विनायकदादा पाटील, भीष्मराज बाम, डॉ.कैलास कमोद, आर्किटेक्ट संजय पाटील, मेघा सायखेडकर, हंसराज पाटील, डॉ.मनोज चोपडा, विजय बुऱ्हाडे, प्रा.निशा पाटील, सचिन जोशी तसेच नाशिककर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. अनिल अवचट (11-03-2017)
नाशिक (प्रतिनिधी) : समाजात आजकाल आत्मसंतुष्टपणा आला असून जगण्यात पोकळपणा निर्माण झाला आहे. यातूनच अप्पलपोटी संस्कृती जन्माला आलेली आहे. संस्कृतीवर तंत्रज्ञानाचे आक्रमण आले असून त्यामुळे माणसामाणसांतला संवाद हरवला आहे. एकंदर संवेदनाच नष्ट होण्यावर याचा परिणाम झाला आहे. त्याला रोखण्यासाठी माणुसपणाचं नातं बळकट करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे ‘आपली बदलती संस्कृती’ या विषयावर बोलतांना केले. यशवंतराव चव्हाण यांच्या 104 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला डिझास्टर मॅनेजमेंट ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-422013 येथे सदर व्याख्यान संपन्न झाले. ते पुढे म्हणाले की, फेसबुक, व्हॉटस्अपसारख्या आभासी जगण्याने माणसे एकमेकांपासून दुरावत चालली आहेत. जुनी नाती विसरत चालली आहेत. याच्यामुळे समाजाची जडणघडणच बदलत चालली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. निसर्ग माणसाला जगणं शिकवतो हेच नेमके आपण विसरलो आहोत. यासाठी निसर्गावर करावे असे डॉ. अवचट म्हणाले.
यावेळी त्यांनी समाजातील वंचित घटकांच्या जगण्याचा आपल्या भाषणातून वेध घेतला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले व डॉ. अनिल अवचट यांचा परिचय सचिव डॉ. मनोज शिंपी यांनी केला. तर सन्मान डॉ. सुधीर संकलेचा यांनी केला. या प्रसंगी प्रतिष्ठानचे अकार्यकारी अध्यक्ष विनायकदादा पाटील,कोषाध्यक्ष विनायक रानडे, सदस्य डॉ. कैलास कमोद, गुरूमित बग्गा तसेच अरुण ठाकूर, प्रमोद पुराणिक, मिलींद धटींगण, धनंजय गोवर्धने, रविंद्र मालुंजकर, स्वप्नील तोरणे आदी
मान्यवर उपस्थित होते.